शिरसगाव (वा.): खासदार गोविंदराव आदिक ग्रामीण शिक्षण संस्थेच्या शिरसगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ (वाणिज्य) महाविद्यालयाच्या सन २००२ च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा व शिक्षकांचा कृतज्ञता सोहळा शनिवारी (२५ ऑक्टोबर) मोठ्या उत्साहात संपन्न झाला. तब्बल २३ वर्षांनी विद्यार्थी आणि त्यांचे सर्व शिक्षक पुन्हा एकत्र आले आणि त्यांनी शाळेमध्ये एक वर्ग भरवून जुन्या आठवणींना उजाळा दिला. या वेळी प्रत्येकाच्या मनात भावनांचा पूर उसळला होता. सोशल मीडियाच्या माध्यमातून ऋषिकेश औताडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या ‘गेट टुगेदर’ची कल्पना प्रत्यक्षात आणली.
या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी शिक्षकांप्रति आदर व्यक्त केला. त्यांनी शिक्षकांना रोपटे आणि भेटवस्तू देऊन सन्मानित केले. माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करताना मैत्री, खोडकरपणा आणि जुन्या आठवणी ताज्या केल्या. काही विद्यार्थ्यांचे डोळे पाणावले होते. या विद्यालयाच्या शिस्तीमुळे आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळेच आज आम्ही उद्योग-व्यवसाय, नोकरीद्वारे प्रगती करून आनंदी जीवन जगत आहोत, अशी कृतज्ञतेची भावना अनेकांनी व्यक्त केली. यावेळी रेणुका गवारे, वैशाली लाके, अनुराधा गवारे, दीपाली यादव, योगेश यादव, दीपक विखे, रमेश बकाल, रितेश सोळस, विशाल सोनार आदींनी मनोगत व्यक्त केले.
विद्यार्थ्यांनी आजही शाळा आणि शिक्षकांबद्दल जपलेला आदर पाहून शिक्षकही भावूक झाले. शिक्षक व विद्यार्थी हे नाते आयुष्यभर टिकणारे असून, भविष्यातही असे उपक्रम घेत राहावे, अशी अपेक्षा शिक्षकांनी व्यक्त केली. लवकरच या शाळेतील सर्व बॅचच्या विद्यार्थ्यांचा भव्य मेळावा आयोजित करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्राचार्य सुभाष काळे यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले. ते म्हणाले, “प्रत्येक विद्यार्थी हा आमचा अभिमान आहे. शाळा म्हणजे आईच असते. त्यामुळे आपण वर्षातून एकदा तरी तिला भेट द्यावी आणि शाळेच्या विकासासाठी हातभार लावावा.” प्रारंभी संस्थापक खासदार गोविंदराव आदिक यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करण्यात आले. सूत्रसंचालन ऋषिकेश औताडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रकाश पारखे यांनी केले. मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी रमेश बकाल, बापू जाधव, सागर वाघ, गणेश वाघ, गजानन गवारे, रितेश सोळस, विशाल सोनार आदींनी परिश्रम घेतले. सामूहिक फोटोसेशननंतर सर्वांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला.






