पुण्यात ध्वनी प्रदूषणात वाढ(फोटो-सोशल मीडिया)
सुनयना सोनवणे/ पुणे : प्रकाश, आनंद आणि उत्साहाचा सण असलेली दिवाळी यंदा पुणेकरांसाठी ‘ध्वनी प्रदूषणाची’ नवी घंटा वाजवून गेली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (एमपीसीबी) प्राथमिक अहवालानुसार, यंदाच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शहरातील आवाजाची पातळी मागील वर्षाच्या तुलनेत लक्षणीयरीत्या वाढली असून ती आरोग्यासाठी गंभीर धोक्याची ठरू शकते.
सरकारी नियमानुसार, निवासी भागात दिवसाची ध्वनी मर्यादा ५५ डेसिबल आणि रात्रीची ४५ डेसिबल इतकी आहे. व्यावसायिक भागांसाठी दिवसाची ६५ आणि रात्रीची ५५ डेसिबल मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. मात्र, यंदा पुण्यातील दिवाळीदरम्यानची आवाजाची सरासरी पातळी या मर्यादेपेक्षा तब्बल १० ते २० डेसिबलने अधिक नोंदवली गेली.
एमपीसीबीच्या आकडेवारीनुसार, दिवसाच्या वेळी आवाजाची सरासरी पातळी ७७.६ डेसिबल, तर रात्रीची पातळी ७३.३ डेसिबल इतकी होती. गेल्या वर्षी हीच पातळी अनुक्रमे ७७.५ आणि ७१ डेसिबल इतकी होती. म्हणजेच, दोन ते तीन डेसिबलने वाढ झाली असून ती तांत्रिकदृष्ट्या महत्त्वाची आणि चिंताजनक मानली जाते.
हेही वाचा : ‘2027 चा विश्वचषक कारकिर्दीचा शेवट…’, एबी डिव्हिलियर्सचे Virat Kohli बद्दल खळबळजनक विधान
लक्ष्मी रोड, शिवाजीनगर, औंध, कर्वे रोड, खडकी, पिंपरी आणि निगडी या भागांत सर्वाधिक आवाज नोंदवला गेला आहे. काही ठिकाणी दिवसभरात आवाजाची पातळी ८० डेसिबलपेक्षा जास्त, तर रात्रीदेखील ७० डेसिबलच्या वर राहिली. एमपीसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, फटाक्यांच्या आतषबाजीमुळे विशेषतः रात्रीच्या वेळेस ध्वनी प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे.
एमपीसीबीने शहरातील शिवाजीनगर, कर्वे रस्ता, सातारा रस्ता, स्वारगेट, येरवडा, खडकी, शनिवारवाडा, लक्ष्मी रस्ता, सारसबाग आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात दिवाळीपूर्व व दिवाळीनंतर दोन्ही वेळचे निरीक्षण केले.
स्वारगेट (९.३%), खडकी (९%), आणि कर्वे रस्ता (५.६%) या भागांत आवाजाची सर्वाधिक वाढ नोंदवली गेली आहे. अनेक ठिकाणी दिवाळीच्या मुख्य दिवशी, म्हणजेच २१ ऑक्टोबर रोजी रात्री १० नंतर, ध्वनी मर्यादांचा सर्रास भंग झाला. काही ठिकाणी आवाजाची पातळी ८५ ते ९० डेसिबल इतकी पोहोचल्याची नोंद झाली. तथापि, काही भागांत थोडासा सकारात्मक बदल दिसून आला. शनिवारवाडा परिसरात आवाजाची पातळी ०.६ टक्क्यांनी, तर सारसबाग भागात ०.५ टक्क्यांनी घटली असल्याचे अहवालात नमूद आहे.
आरोग्यतज्ज्ञांच्या मते, ७० डेसिबलपेक्षा जास्त आवाज सतत ऐकू आल्यास कानातील तंतूंचे नुकसान होऊ शकते. अशा प्रदूषणामुळे झोपेची गुणवत्ता घसरते, मानसिक ताण वाढतो आणि हृदयविकाराचा धोका निर्माण होतो.
डॉक्टरांचा इशारा आहे की, लहान मुले, वृद्ध नागरिक आणि हृदयविकारग्रस्त व्यक्ती या गोंगाटामुळे सर्वाधिक प्रभावित होतात. शहरातील ‘ध्वनी प्रदूषण’ हे आता केवळ अस्वस्थतेचे नव्हे तर सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने गंभीर आव्हान बनत चालले आहे.
दिवाळीचा आनंद आणि उजेड शहराच्या प्रत्येक कोपऱ्यात झळकला, परंतु त्या उजेडात शांततेचा दिवा मात्र विझला आहे. फटाक्यांच्या ‘ध्वनी जल्लोषा’मुळे शहर गजबजले असले तरी, या उत्साहाने पर्यावरण आणि आरोग्य या दोन्हींच्या दृष्टीने काळजीची घंटा वाजवली आहे.
आरोग्यासाठी धोक्याची घंटा ‘ध्वनी प्रदूषण हे फक्त कानांना नुकसान करत नाही, तर त्याचा थेट परिणाम शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होतो. ७० डेसिबलपेक्षा जास्त आवाज सतत राहिल्यास, शरीरात स्ट्रेस हार्मोन्स (तणाव संप्रेरके) वाढतात, ज्यामुळे मानसिक ताण, चिडचिडेपणा, झोपेचे गंभीर विकार आणि रक्तदाब वाढू शकतो. यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा किंवा उच्च रक्तदाबाचा धोका कैक पटीने वाढतो.’ – डॉ. राहुल तेलंग, कान-नाक-घसा तज्ज्ञ फटाक्यांच्या पाकिटावर प्रदूषणावर होणारा परिणाम स्पष्ट लिहावा. तसेच सायलेन्स झोनमध्ये फटाके वाजवायची परवानगी असावी की नाही, हे नियमावलीत स्पष्ट असावे. आनंद साजरा करताना पर्यावरण आणि शांततेचा मान राखणे ही आपली जबाबदारी आहे. रवींद्र सिन्हा, सचिव, बाणेर-पाषाण लिंक रोड समिती






