Blind T20 World Cup Final : पाकिस्तानने जिंकला टी-20 वर्ल्ड कप; अंतिम सामन्यात बांगलादेशचा 10 गडी राखून पराभव
Pakistan wins Blind T20 World Cup 2024 : पाकिस्तानने अंध T20 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले असून, अंतिम सामन्यात बांगलादेशचा 10 गडी राखून पराभव केला. या विजयासह पाकिस्तानने मोठा इतिहास रचला आहे. इतिहासात पाकिस्तानी संघाने हे विजेतेपद पटकावण्याची ही पहिलीच वेळ आहे. या विजेतेपदाच्या लढतीत प्रथम खेळणाऱ्या बांगलादेशला निर्धारित 20 षटकांत 139 धावा करता आल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानने एकही विकेट न गमावता अवघ्या 11 षटकांत लक्ष्य गाठून ऐतिहासिक शैलीत विश्वचषक जिंकला. पाकिस्तानकडून कर्णधार निसार अलीने नाबाद 72 धावा केल्या, तर मोहम्मद सफदरने त्याला चांगली साथ देत 47 नाबाद धावा केल्या.
पाकिस्तानचा मोठा विजय
सय्यद सुलतान शाह यांच्या संघाचे अभिनंदन
पाकिस्तानसाठीही हा विजय संस्मरणीय ठरला कारण संपूर्ण स्पर्धेत त्यांना कोणीही हरवू शकले नाही. या कामगिरीबद्दल पाकिस्तान अंध क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष सय्यद सुलतान शाह यांनी आपल्या संघाचे अभिनंदन केले आहे. पहिल्या डावात पाकिस्तानचा गोलंदाज बाबर अलीने 4 षटकात अवघ्या 24 धावा देत 2 बळी घेत कहर केला. त्याच्याशिवाय मोहम्मद सलमान आणि मतिउल्ला यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
आतापर्यंत भारताने सर्व विजेतेपद पटकावले
2012 साली अंध T20 विश्वचषक स्पर्धेला सुरुवात झाली, त्यानंतर भारतीय संघाने 2017 आणि पुन्हा 2022 मध्ये विश्वचषक जिंकला. अंध T20 विश्वचषक स्पर्धेत विजेतेपदाची हॅट्ट्रिक साधल्यानंतर भारत यावेळी स्पर्धेत सहभागी होऊ शकला नाही. ब्लाइंड टी20 वर्ल्ड कप पाकिस्तानमध्ये आयोजित करण्यात आला होता, दरम्यान, चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या वादामुळे, भारत सरकारने आपला अंध संघ सीमेपलीकडे पाठवण्यास नकार दिला होता.
पाकिस्तान आतापर्यंत दोनदा अंतिम फेरीत पोहचलाय
आम्ही तुम्हाला स्मरण करून देऊया की, पाकिस्तान आत्तापर्यंत दोनदा अंध टी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला होता. 2012 आणि 2017 च्या आवृत्त्यांमध्ये ते भारताकडून अनुक्रमे 29 धावांनी आणि 9 गडी राखून पराभूत झाले. आता 2024 मध्ये अखेर पाकिस्तान संघाने पराभवाचा ट्रेंड संपवत पहिले विजेतेपद पटकावण्यात यश मिळविले आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीवरून वाद सुरू असतानाच अंध संघाची मोठी कामगिरी
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या यजमानपदावरून पाकिस्तानचे नाट्य संपणार आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयसमोर शरणागती पत्करली आहे. आता पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ‘हायब्रीड मॉडेल’ स्वीकारण्यास तयार आहे. या मॉडेल अंतर्गत, भारतीय क्रिकेट संघ चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने पाकिस्तानमध्ये खेळणार नाही तर इतर कोणत्याही देशात खेळणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव बीसीसीआयने आपला संघ तिथे पाठवण्यास नकार दिला होता.
पीसीबीने घेतली माघार
बीसीसीआयच्या नकारानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) अनेक धमक्या दिल्या, पण आता ते भानावर आले आहेत. पीसीबीला प्रत्यक्षात जाग आल्याचे दिसते. दुबईतील पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी चॅम्पियन्स ट्रॉफी हायब्रीड मॉडेलमध्ये खेळवली जाईल, अशी पुष्टी केली आहे, जर चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन युएईमध्ये केले जाईल. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अंडर-19 आशिया कप सामन्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना पीसीबीचे अध्यक्ष नक्वी म्हणाले की, जो काही निर्णय घेतला जाईल तो जागतिक क्रिकेटच्या भल्यासाठीच असणार आहे.
हेही वाचा : सूर्या आणि शिवम दुबेचा सेनादलाच्या गोलंदाजांवर बरसला कहर; नवीन गोलंदाज गेले चक्रावून; पाहा VIDEO
हेही वाचा : IPL च्या इतिहासातील सर्वात महाग विकले जाणारे अनकॅप खेळाडू; सर्व विक्रम निघाले मोडीत






