
डीएसपी करंडक मान्सून लीग
पहिल्या लढतीत साई सत्यम क्रिकेट क्लबने गोल्डन क्रिकेट क्लबचा ९१ धावांनी धुव्वा उडवला. प्रथम फलंदाजी करताना साई सत्यम संघाने २० षटकांत ६ बाद १६२ धावांपर्यंत मजल मारली. यात पवन आनंदने ४८ चेंडूंत ११ चौकार व एका षटकारासह नाबाद ७८ धावा फटकावल्या. त्याला विक्रांत दुबे (२६ धावा) आणि सागर भापकर (१८ धावा) यांनी साथ दिली. गोल्डन क्लबच्या गणेश खांडवेने २ तर नवीन कुमारने १ गडी बाद केला.
याला म्हणतात पॅशन! निकेतची वादळी शतकी खेळी; Spartan Monsoon League मध्ये टायटन बुल्स्चा थरारक विजय
उत्तरादाखल खेळताना गोल्डन क्रिकेट क्लबचा डाव १५.१ षटकांत अवघ्या ७१ धावांत संपुष्टात आला. त्यांच्याकडून महेश दादा (१९), रोहन चौरसिया (१८) आणि अभय शिंदे (१३) यांचा अपवाद वगळता इतर फलंदाज अपयशी ठरले. साई सत्यमच्या अतिक सहायने अवघ्या ९ धावांत ३ तर मोहित चोरडियाने १६ धावांत ३ बळी टिपले; रूपेन गायकवाड व विजय पटेल यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. पवन आनंद सामनावीर ठरला.
दुसऱ्या सामन्यात ईगल्स क्रिकेट क्लबने मायटी स्टार्सवर ४ धावांनी निसटता पण रोमहर्षक विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या ईगल्स क्लबचा डाव १४.२ षटकांत ८६ धावांत गुंडाळला गेला. यात पुलकितने २०, सुनील झूतशीने १७ तर दिव्यांशु पाठकने १४ धावांचे योगदान दिले. मायटी स्टार्सच्या सचिन नायरने १७ धावांत ३ बळी घेतले.
IND Vs JPN: पावसाचा व्यत्यय अन् शेवटच्या बॉलपर्यंत थरार! जपानवर भारताचा 2 रन्सने सनसनाटी विजय
महेश कोकराळेने २ तर लहू लोहारने १ गडी बाद केला. विजयासाठी आवश्यक असलेल्या ८७ धावांच्या सोप्या आव्हानाचा पाठलाग करताना मायटी स्टार्सचा संघ १९ षटकांत ८२ धावांत सर्वबाद झाला. संदीप ताऊर (नाबाद २४), वैभव जठार (२२) आणि लहू लोहार (१५) यांनी विजयाचा प्रयत्न केला, मात्र ईगल्सच्या अंकित सिंगने अवघ्या ७ धावांत ३ बळी घेत सामन्याचा रंग बदलला. आकाश सिंगने १४ धावांत ३ गडी बाद करत विजयात मोलाची भर घातली. अंकित सिंग सामनावीर ठरला.
तिसऱ्या सामन्यात विशाल गायकवाडच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर पुणेरी क्रिकेट क्लबने कॉर्पोरेट क्रशर्स संघाला १५ धावांनी पराभूत केले. प्रथम फलंदाजी करताना पुणेरी क्रिकेट क्लबने १९.४ षटकांत सर्वबाद ११८ धावा केल्या. यात विशाल गायकवाड (२४ धावा), रजत आध्ये (२२ धावा), महेश चव्हाण (१२ धावा) आणि आदेश उपाध्याय (११ धावा) यांनी फलंदाजीत योगदान दिले. कॉर्पोरेट क्रशर्सकडून आनंद के. याने ३७ धावांत ५ बळी टिपले, तर राहुल रांगनेकरने २५ धावांत ३ बळी मिळवले.
यानंतर ११९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कॉर्पोरेट क्रशर्सचा संघ १७.४ षटकांत १०३ धावांवर गारद झाला. गोपाळ अगरवाल (१६ धावा), प्रजेश (१४ धावा), कुलवीर सिंग (११ धावा) आणि वैभव गडकरी (११ धावा) यांची खेळी संघाला विजय मिळवून देण्यास पुरेशी ठरली नाही. पुणेरी क्रिकेट क्लबच्या प्रसाद देवकातेने २३ धावांत ४ तर विशाल गायकवाडने १४ धावांत ३ गडी टिपून प्रतिस्पर्ध्यांचा डाव रोखला. अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या विशाल गायकवाडला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.