
Ishan Kishan Century in duleep Trophy
ईस्ट झोनच्या फलंदाजांनी पहिल्या दिवशी शानदार कामगिरी केली. ईशानने संघासाठी शतक झळकावले, तर इतर तीन फलंदाजांनी अर्धशतके झळकावली. अभिमन्यू, शिखर मोहन आणि कुशाग्र अर्धशतके झळकावण्यात यशस्वी ठरले. वैभव सूर्यवंशीसुद्धा चांगल्या लयीत होता, पण त्याचे अर्धशतक हुकले. साऊथ झोनकडून चामा मिलिंगने दोन विकेट्स घेतले, तर त्रिपुराना विजयने एक विकेट घेतला.
ईस्ट झोनचा कर्णधार ईशान किशनने दमदार कामगिरी केली. दुलीप ट्रॉफी फायनलच्या पहिल्या दिवशी त्याने १४ चौकार आणि एका षटकारांसह १३५ चेंडूंमध्ये नाबाद १११ धावा केल्या. किशनच्या या स्फोटक खेळीमुळे पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ईस्ट झोनने ४ विकेट्स गमावून ३८५ धावा केल्या आहेत.
ईस्ट झोनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अभिमन्यू ईश्वरन आणि वैभव सूर्यवंशी यांनी चांगली सुरुवात केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी १०० धावा जोडल्या. ही भागीदारी चामा मिलिंगने तोडली. त्याने वैभव सूर्यवंशीला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. वैभवने ३७ चेंडूंमध्ये पाच चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ४४ धावा केल्या. तर, ईश्वरनने अर्धशतक झळकावले आणि ८६ चेंडूंमध्ये १० चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ७२ धावा करून तो धावबाद झाला.
सुदीप कुमार सहा धावा करून बाद झाला. त्यानंतर शिखर मोहनने कर्णधार ईशानसोबत ९४ धावांची भागीदारी केली. शिखरने १२० चेंडूंमध्ये नऊ चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ८५ धावा केल्या आणि तो मिलिंदच्या गोलंदाजीवर बाद झाला. यानंतर ईशान आणि कुशाग्र यांनी शानदार फलंदाजी करत एकही विकेट पडू दिली नाही. आतापर्यंत या दोघांमध्ये पाचव्या विकेटसाठी १४४ धावांची भागीदारी झाली आहे. ईशानने शतक झळकावले आहे, तर कुशाग्र अर्धशतक करून नाबाद आहे. आता सामन्याच्या दुसऱ्या दिवशी दोन्ही फलंदाज आपला डाव पुढे नेण्याचा प्रयत्न करतील.