
इंग्लंडच्या कर्णधाराची सेमीफायनलपूर्वी 'गर्जना' (Photo Credit- X)
या विश्वचषकात इंग्लंडचा प्रवास चढ-उतारांचा राहिला आहे. साखळी फेरीत त्यांना नेपाळ, स्कॉटलंड आणि इटली यांसारख्या संघांविरुद्ध विजय मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला होता, तर वेस्ट इंडिजकडून त्यांना मानहानीकारक पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, सुपर-८ फेरीपासून इंग्लंडने आपला खेळ उंचावला. सुपर-८ मध्ये श्रीलंका, पाकिस्तान आणि न्यूझीलंड या बलाढ्य संघांना धूळ चारत ते अपराजित राहिले. विशेषतः न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात अखेरच्या ३ षटकांत ४३ धावांची गरज असताना इंग्लंडने मिळवलेला विजय त्यांच्या आत्मविश्वासात भर टाकणारा ठरला आहे.
संघाच्या लढाऊ वृत्तीबद्दल बोलताना ब्रूक म्हणाला, “आम्ही चुरशीचे सामने जिंकत आहोत आणि हेच एका चांगल्या संघाचे लक्षण आहे. कोणत्याही परिस्थितीत आपण सामन्यातून बाहेर नसतो, हे मी या स्पर्धेतून शिकलो आहे. माझ्या संघात दबावाखाली शांत राहणारे आणि विजयाची भूक असलेले खेळाडू आहेत. मैदानावर आम्ही इतकी आक्रमकता ठेवू की समोरच्या फलंदाजाला खेळणे असह्य होईल.”
स्टार फलंदाज जोस बटलर सध्या फारशा फॉर्ममध्ये नसल्याची चर्चा आहे, तरीही ब्रूकने आपल्या फलंदाजीवर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे. तो म्हणाला, “जोस बटलर हा या खेळातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे, त्याच्या फॉर्मबद्दल काळजी करण्याची गरज नाही. तो कोणत्याही क्षणी सामन्याचे चित्र बदलू शकतो. आमच्या पहिल्या सात फलंदाजांमध्ये इतकी ताकद आहे की, जर एखाद्याने मोठी खेळी केली तर प्रतिस्पर्धी संघाची रणनीती कोलमडून पडते.”
ब्रूकने या स्पर्धेत प्रभावी कामगिरी करणाऱ्या विल जॅक्सचे विशेष कौतुक केले. तो म्हणाला की, जॅक्सने कठीण परिस्थितीत स्वतःला सिद्ध केले आहे. भारतीय चाहत्यांसमोर खेळण्याच्या आव्हानाबद्दल बोलताना तो म्हणाला, “स्टेडियममध्ये भारतीय समर्थकांचा मोठा आवाज असेल आणि दोन्ही संघांवर प्रचंड दबाव असेल. मात्र, अशाच मोठ्या वातावरणात खेळण्याची आम्हाला सवय असून आम्ही उलटफेर करण्यासाठी सज्ज आहोत.”