(फोटो सौजन्य - सोशल मिडिया)
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 5 मार्च रोजी मुंबईत आकाश निरभ्र राहणार आहे. आणि पावसाबाबत बोलायचं तर पावसाची शक्यता शून्य टक्के असल्याचं स्पष्ट केलं आहे. दिवसाचं कमाल तापमान सुमारे 33 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. तर रात्रीचे तापमान 25 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आर्द्रतेचे प्रमाण 35 ते 51 टक्क्यांच्या दरम्यान असणार आहे. म्हणजेच खेळाडूंना हवामानाशी संबंधित कोणत्याही समस्यांना तोंड द्यावं लागणार नाही. त्यामुळे सेमी फायनलचा सामना चुरशीचा आणि धडाकेबाज होणार यात काहीही शंका नाही.
वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी सामान्यतः फलंदाजांना अनुकूल मानली जाते. स्वच्छ हवामान असल्यामुळे दव पडण्याची शक्यता वाढते. त्यामुळे त्याचा फायदा फलंदाजांना होऊ शकतो. त्यामुळे दवाचा फॅक्टर वानखेडेवर नेहमीच मोठा मानला जातो. ज्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.
सध्या पावसाची शक्यता नसली तरी, खबरदारी म्हणून ICCने राखीव दिवस राखून ठेवला आहे. जर काही कारणास्तव सामना 5 मार्च रोजी पूर्ण होऊ शकला नाही किंवा पावसाने हजेरी लावलीच तर सामना 6 मार्च, शुक्रवार रोजी राखीव दिवशी खेळवला जाईल. पण जर सेमी फायनलमध्ये आणि राखीव दिवस दोन्ही पावसामुळे वाया गेलेच तर नियमांनुसार इंग्लंड थेट अंतिम फेरीत पोहोचेल. कारण सुपर 8 टप्प्यात इंग्लंड त्यांच्या गटात पहिल्या स्थानावर राहिला होता, तर भारत दुसऱ्या स्थानावर होता. त्यामुळे या नियमानुसार इंग्लंडचा पगडा जड असल्याचं दिसून येतं. पण हे नियम पावसाचा व्यत्य असेल तरच लागू होतात.
या सामन्यातील विजेता संघ 8 मार्च रोजी अंतिम फेरीत भिडेल. दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा आहे. भारत सलग तिसऱ्यांदा T20 विश्वचषक उपांत्य फेरीत इंग्लंडशी भिडत आहे. ज्यामुळे सामन्याचा उत्साह वाढला आहे. स्वच्छ हवामानामुळे चाहत्यांच्या चिंता कमी झाल्या आहेत. सर्वांचे लक्ष आता 5 मार्च रोजी संध्याकाळी मुंबईत होणाऱ्या आणखी एका मोठ्या क्रिकेट सामन्याकडे लागले आहे.






