
Footboll : फुटबॉलच्या मैदानात एकमेकांवर असे धडकले, की एकाला मृत्यूनेच गाठले!
फुटबॉल (Football) सामन्यात एका 37 वर्षीय फुटबॉलपटूचा मृत्यू झाला आहे. ही घटना झारखंडच्या बोकारो (Bokaro) स्टील सिटीमधील नव्या बस्ती मैदानात घडली. येथील बजरंग क्लबच्या वतीने तीन दिवसीय दिवस-रात्र फुटबॉल स्पर्धे (Tournament)चे आयोजन करण्यात आले असून त्यात ही दुर्दैवी घटना घडलीय.
गोमियाच्या खंबरा परिसरातील रहिवासी असलेला कजरा मुर्मू असे मृत फुटबॉलपटूचे नाव आहे. सामन्यादरम्यान मुर्मू व एका खेळाडूची जोरदार धडक झाली. ही धडक एवढी जबरदस्त होती की, मुर्मू मैदानात कोसळला. कजराला तातडीने डीभीसी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांकडून तातडीने उपचार सुरू झाले, पण शुक्रवारी रात्री उशीरा कजराने अखेरचा श्वास घेतला.
कजराच्या मृत्यूची माहिती मिळताच त्याच्या कुटुंबियांसह मोठ्या संख्येने क्रीडाप्रेमी रुग्णालयात दाखल झाले. काही लोकांनी यावेळी हुल्लडबाजी करण्याचा प्रयत्न केला. मृताच्या नातेवाईकांना मदत देण्याची मागणी काही जण करत होते.
या लोकांकडून आर्थिक मदतीसह घटनेचा तपास करण्याची जोरदार मागणी करण्यात आली.
कजराला एक लहान मुलगा व मुलगी आहे. त्याच्या या अचानक झालेल्या मृत्यूमुळे त्यांच्यावरील वडिलांचे छत्र हरपले आहे. त्यांच्याकडे पाहत अनेकांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या होत्या. स्थानिक पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला असून घटनेशी संबंधित सर्व पैल्लूंचा विचार केला जात आहे.
या घटनेनंतर नियोजन समितीने स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला. स्पर्धा रद्द झाल्याचे कळताच खेळाडू व क्रीडाप्रेमींमध्ये निराशेचं वातावरण निर्माण झाले. फुटबॉल प्रेमींनी यावेळी कजरा मुर्मूच्या निधनावर श्रद्धांजली वाहत त्याच्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त केली.