
photo- social media
बांग्लादेशातील ढाका नॅशनल स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या हाय-व्होल्टेज सामन्यात, भारतीय खेळाडूंनी सुरुवातीपासूनच आपले वर्चस्व राखले आणि पहिल्याच हाफमध्ये ३ गोल केले. सामन्याच्या शेवटच्या क्षणी पाकिस्तानने पुनरागमन करण्याचा प्रयत्न करत दोन गोल केले असले तरी, ते भारताला जिंकण्यापासून रोखू शकले नाहीत. भारताच्या या विजयाचा हिरो सुहेल भट्ट होता, ज्याने सामन्यात २ गोल केले.
IPL 2027 आधी CSK-SRH चा गेमप्लॅन? ‘या’ चार खेळाडूंची ट्रेड डील फिक्स; कोणाचा पत्ता कट?
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतीय खेळाडूंनी सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला. सामन्याच्या १३ व्या मिनिटाला, मोहम्मद सोहेलच्या अप्रतिम पासवर सुहेल भट्टने गोल करून भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. सात मिनिटांनंतर, १९ व्या मिनिटाला, सुहेल भट्टने पुन्हा एकदा गोल केला. या गोलमुळे भारताची आघाडी २-० अशी वाढली. यानंतरही भारतीय संघाने आपले आक्रमण सुरूच ठेवले आणि २३ व्या मिनिटाला मंगलनथांग किपगेनने तिसरा गोल करून पाकिस्तानच्या अडचणीत भर घातली.
पाकिस्तानी गोलरक्षकाने चेंडू थांबवण्याचा प्रयत्न केला, पण तो अयशस्वी ठरला. त्यामुळे, पहिल्या हाफच्या अखेरीस भारतीय संघाने ३-० अशी भक्कम आघाडी घेतली होती. दुसरीकडे, पाकिस्तानी संघाला पहिल्या हाफमध्ये भारतीय बचाव भेदण्यात अपयश आले.
Winning start for the defending champions in the #SAFFChampionship2026! 🇮🇳💙#PAKIND #BlueTigers #IndianFootball pic.twitter.com/APBipSFMxj — Indian Football (@IndianFootball) November 5, 2026
दुसऱ्या हाफमध्येही भारतीय संघाने आपले वर्चस्व कायम ठेवत पाकिस्तानला गोल करण्याची एकही संधी दिली नाही. भारत हा सामना ३-० ने सहज जिंकेल असे वाटत होते, पण इंज्युरी टाइममध्ये पाकिस्तानने अचानक सामन्याचे चित्र पालटले. ९१ व्या मिनिटाला नजीब उल्लाहने पाकिस्तानचा पहिला गोल करून स्कोअर ३-१ असा केला.
त्यानंतर पाकिस्तानी खेळाडू आक्रमक झाले आणि ९४ व्या मिनिटाला अली खान गाझीने विलक्षण चपळाई दाखवत दुसरा गोल केला. या गोलमुळे स्कोअर ३-२ झाला. मात्र, त्यानंतर पाकिस्तानला बरोबरीचा गोल करता आला नाही. अखेरीस, भारतीयांनी आपली आघाडी कायम राखली आणि सामना ३-२ ने जिंकला.