Michael Clarke Diagnosed: ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्क (Michael Clarke) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्वचेच्या कर्करोगाशी झुंजणाऱ्या या दिग्गज खेळाडूने नुकतीच एक शस्त्रक्रिया करून घेतली आणि सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत लोकांना एक महत्त्वाचे आवाहन केले. ‘माझी ७ वर्षांची मुलगी आहे, मला कुठेही जायचे नाही’ असे सांगत त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या, ज्यामुळे तो चर्चेत आला.
२००६ साली मायकेल क्लार्कला त्याच्या त्वचेच्या कर्करोगाबद्दल पहिल्यांदा समजले. तेव्हापासून तो या आजारावर सातत्याने उपचार घेत आहे. नुकतीच त्याने नाकावर एक शस्त्रक्रिया केली असून, कर्करोगाचा भाग काढून टाकण्यात आला आहे. शस्त्रक्रियेनंतर लगेचच त्याने लोकांना त्वचेची नियमित तपासणी करण्याचे आवाहन केले.
शस्त्रक्रियेनंतर सोशल मीडियावर फोटो शेअर करत क्लार्कने लिहिले, “त्वचेचा कर्करोग हा एक गंभीर आजार आहे, विशेषतः ऑस्ट्रेलियासारख्या देशात. आज माझ्या नाकावरील आणखी एक कर्करोग बाहेर काढला आहे. ही एक मैत्रीपूर्ण आठवण आहे की तुम्हीही तुमच्या त्वचेची तपासणी करून घ्यावी. उपचारापेक्षा प्रतिबंध नेहमीच चांगला असतो. सुदैवाने, मला या आजाराबद्दल वेळेवर कळले.” त्याने आपल्या सर्जन डॉ. बिश सोलिमन यांचे आभार मानले आणि सांगितले की यापूर्वीही त्याने अनेक वेळा त्वचेच्या शस्त्रक्रिया केल्या आहेत.
मायकेल क्लार्कने ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटला अनेक वर्षे नेतृत्व दिले. त्याच्या नेतृत्वाखाली संघाने २०१५ साली एकदिवसीय विश्वचषक जिंकला, त्यानंतर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. २००३ मध्ये त्याच्याच नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने ॲशेस मालिकेत इंग्लंडला ५-० ने क्लीन स्वीप केले होते.
त्याने ऑस्ट्रेलियासाठी ११५ कसोटी, २४५ एकदिवसीय आणि ३४ टी-२० सामने खेळले. कसोटीमध्ये त्याने ८६४३ धावा (२८ शतके), एकदिवसीय सामन्यांमध्ये ७९८१ धावा (८ शतके) आणि टी-२० मध्ये ४८८ धावा केल्या. क्लार्कची ही कामगिरी त्याला ऑस्ट्रेलियाच्या महान खेळाडूंमध्ये स्थान देते.