हार्दिक पंड्या (फोटो- ians)
हार्दिक पंड्याला या टी 20 सिरिजमध्ये भारतीय संघात स्थान मिळण्याची शक्यता वाटत होती. मात्र आता त्याच्या पायाला दुखापत झाल्याचे समजते आहे. भारतीय क्रिकेट संघातील स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याच्या आंतरराष्ट्रीय संघात पुनरागमन करण्याच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसला आहे. १३ सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या T20 मालिकेपूर्वी सरावादरम्यान हार्दिकच्या पायाला दुखापत झाली आहे.
श्रीलंका दौरा संपताच BCCI ॲक्शनमध्ये! टीम इंडियाच्या स्टार्सची फिटनेस परीक्षा; ‘हे’ खेळाडू गैरहजर?
बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत जोरदार सराव करत असताना हार्दिकच्या पायाला दुखापत झाली. नेटमध्ये फलंदाजी आणि गोलंदाजीचा सराव करताना त्याला अचानक वेदना जाणवू लागल्या. वैद्यकीय पथकाने तातडीने त्याच्यावर प्राथमिक उपचार केले असून, त्याच्या दुखापतीचे स्वरूप नेमके किती गंभीर आहे हे तपासण्यासाठी त्याची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे.
गेल्या काही काळापासून दुखापतींमुळे संघाबाहेर असलेल्या हार्दिक पंड्याकडून या मालिकेत दमदार पुनरागमनाची अपेक्षा व्यक्त केली जात होती. आगामी टी-२० वर्ल्डकपच्या दृष्टीने अफगाणिस्तानविरुद्धची मालिका हार्दिकसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. मात्र, ऐन मालिकेच्या तोंडावर झालेल्या या दुखापतीमुळे निवड समिती आणि संघ व्यवस्थापनाची चिंता वाढली आहे.
हार्दिकच्या दुखापतीवर सध्या बीसीसीआयचे वैद्यकीय पथक लक्ष ठेवून आहे. तो पहिल्या सामन्यापर्यंत तंदुरुस्त होईल की त्याला या मालिकेला पूर्णपणे मुकावे लागेल, याचा निर्णय पुढील दोन दिवसांमध्ये वैद्यकीय चाचण्यांच्या रिपोर्टनंतरच स्पष्ट होणार आहे. जर हार्दिक या मालिकेतून बाहेर पडला, तर त्याच्या जागी संघात कोणाला संधी मिळते याकडे सर्व चाहत्यांचे लक्ष लागले आहे. हार्दिक पंड्याने आपला शेवटचा सामना २४ मे रोजी आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससाठी खेळला होता. त्यानंतर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून सातत्याने दूर आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेच्या माध्यमातून तो पुनरागमन करेल अशी अपेक्षा होती, परंतु या दुखापतीमुळे त्याच्या खेळण्यावर पुन्हा एकदा अनिश्चिततेचे सावट पसरले आहे.






