GT vs MI: Hardik Pandya's objections did not stop!
MI vs GT : आयपीएल 2025 च्या 18 व्या हंगामातील 9 वा सामना काल (दि. 29 मार्च) मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सचा 36 धावांनी दणदणीत पराभव केला. या हंगामातील हा मुंबई इंडियन्सचा सलग दूसरा पराभव ठरला. आयपीएल 2025 मध्ये मुंबई चांगल्या फॉर्ममध्ये नसलेली दिसून येत आहे. त्याचा फटका मुंबईला गेल्या दोन सामन्यात बसला आहे. या सामन्यात मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्याने पुन्हा एकदा आधी केलेल्या चुकीची पुनरावृत्ती केली आहे, ज्यासाठी त्याच्यावर या हंगामतील पहिल्या सामन्यात बंदी घालण्यात आली होती.
आयपीएलच्या 18 व्या हंगामातील मुंबई इंडियन्सच्या पहिल्या सामन्यातून हार्दिक पांड्यावर बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे तो चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध पहिला सामना खेळू शकला न् नव्हता. संथ षटके टाकल्याबद्दल त्याच्यावर बंदी घालण्यात आली होती. पण, आयपीएल 2025 चा पहिला सामना खेळणाऱ्या हार्दिक पांड्याने पुन्हा एकदा तीच चूक केली आहे. त्या चुकीचा परिणाम त्याला भोगावा लागणार आहे.
मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याला 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या गुजरात विरुद्धच्या सामन्यात स्लो ओव्हर रेटमुळे त्याला हा दंड ठोठावण्यात आला आहे. या सामन्यात मुंबईचे गोलंदाज निर्धारित वेळेत 20 षटके टाकण्यात अपयशी ठरले. त्यानंतर शेवटच्या षटकात एक कमी क्षेत्ररक्षक 30 यार्डच्या बाहेर ठेवावा लागला होता.
आयपीएल आचारसंहितेच्या कलम 2.2 अंतर्गत हा त्याच्या संघाचा हंगामातील पहिला गुन्हा आहे, त्यामुळे हार्दिक पांड्याला 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. अशा स्थितीत आता हार्दिक ती चूक करणार नाही, अशी अपेक्षा आहे.
नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्यात गुजरातने मुंबुईचा पराभव केला. या विजयाने गुजरातने आयपीएल 2025 मधील पहिला विजय मिळवला. तर मुंबईला मात्र लागोपाठ दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले. गुजरात टायटन्सकडून प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 8 गडी गमावून 196 धावांचे लक्ष्य देण्यात आले होते. 197 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सची अवस्था वाईट झाली आणि 6 गड्यांच्या मोबदल्यात मुंबई 160 धावापर्यंतच मजल मारू शकली. त्यामुळे त्यांना 36 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.