Diabetes Increases Cancer Surgery Infection
जागतिक मधुमेह दिनानिमित्त डॉक्टरांनी कर्करोगावरील उपचारांपूर्वी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. यामुळे शस्त्रक्रिया अधिक सुरक्षित होण्यास आणि रुग्णाची लवकर रिकव्हरी होण्यास मदत होऊ शकते. मधुमेहामुळे शरीरातील रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण नियंत्रित करण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होतो. तसेच शरीराची नैसर्गिकरित्या जखम भरून काढण्याची क्षमताही कमी होऊ शकते.
मुंबईतील एसएसओ रूग्णालयातील हेड अँड नेक कॅन्सर डॉ. अमित चक्रवर्ती म्हणाले, “रक्तातील साखरेची पातळी दीर्घकाळ जास्त राहिल्यास शरीरातील रक्ताभिसरणावर परिणाम होतो. तसेच संसर्गाशी लढण्याची शरीराची क्षमता कमी होते आणि शरीरातील खराब झालेल्या पेशी व ऊतींची दुरुस्ती होण्याची प्रक्रिया मंदावते. कर्करोगाच्या शस्त्रक्रियेनंतर या कारणांमुळे जखमेशी संबंधित गुंतागुंत होण्याची शक्यता वाढते. यामध्ये जखमेला संसर्ग होणे, शस्त्रक्रियेनंतरची जखम भरून येण्यास विलंब होणे आणि काही वेळा अतिरिक्त वैद्यकीय उपचारांची गरज भासणे यांचा समावेश होतो.”
डॉ. अमित पुढे म्हणाले, “त्यामुळे कर्करोगावरील उपचार सुरू करण्यापूर्वी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवणे हा शस्त्रक्रियेच्या तयारीचा महत्त्वाचा भाग आहे. मधुमेह किती नियंत्रणात आहे, हे समजून घेण्यासाठी रुग्णांनी रक्तातील साखरेची तपासणी तसेच HbA1c चाचणी करून घेणे आवश्यक आहे. तपासणीच्या निष्कर्षांनुसार डॉक्टर मधुमेहाची औषधे, इन्सुलिनचे डोस, आहाराचे नियोजन आणि रक्तातील साखरेची तपासणी किती वेळा करावी यामध्ये आवश्यक बदल करू शकतात.
शस्त्रक्रियेपूर्वी आणि शस्त्रक्रियेनंतर रक्तातील साखरेचे योग्य व्यवस्थापन केल्यास गुंतागुंत होण्याचा धोका कमी होण्यास आणि रुग्ण लवकर बरा होण्यास मदत होते. मात्र, रक्तातील साखरेची पातळी अगदी योग्य होईपर्यंत कर्करोगावरील उपचार विनाकारण पुढे ढकलू नयेत. रुग्णाच्या परिस्थितीनुसार उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या टीमने योग्य निर्णय घेणे महत्त्वाचे आहे.
याशिवाय, रुग्णांनी आपल्या वैद्यकीय इतिहासाची संपूर्ण माहिती शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांना देणे आवश्यक आहे. रुग्णाला किती वर्षांपासून मधुमेह आहे, अलीकडील रक्तातील साखरेची पातळी किती आहे, HbA1c चाचणीचे निष्कर्ष काय आहेत, कोणती औषधे सुरू आहेत, इन्सुलिन घेतले जाते का, तसेच मधुमेहामुळे किडनीचे आजार, नसांचे नुकसान, हृदयविकार किंवा जखम भरून येण्यास होणारा विलंब अशा काही समस्या आहेत का, याची माहिती डॉक्टरांना द्यावी. यापूर्वी शस्त्रक्रियेनंतर संसर्ग झाला असल्यास किंवा कोणत्याही औषधाची ॲलर्जी असल्यास त्याबद्दलही डॉक्टरांना सांगावे. तसेच सध्या सुरू असलेल्या इतर औषधांची माहिती देणेही महत्त्वाचे आहे.”
अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालयातील एंडोक्रिनोलॉजिस्ट डॉ.भाविक सगलानी म्हणाले, “शस्त्रक्रियेपूर्वी रुग्णांनी स्वतःहून मधुमेहाची औषधे बंद करू नयेत किंवा त्यांचे डोस बदलू नयेत. शस्त्रक्रियेच्या वेळी औषधांमध्ये कोणते बदल करायचे, किती वेळ उपाशी राहायचे आणि रक्तातील साखरेची तपासणी कशी करायची, याबाबत उपचार करणारी डॉक्टरांची टीम योग्य सूचना देते.
शस्त्रक्रियेनंतर काही लक्षणांकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. जखमेभोवती वाढणारा लालसरपणा, सूज, जखमेतून असामान्य द्रव बाहेर येणे, ताप येणे, वेदना वाढणे किंवा जखम भरून येण्यास विलंब होणे ही धोक्याची लक्षणे असू शकतात. अशी लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांना कळवावे. यामुळे सुरुवातीच्या टप्प्यातील गुंतागुंत गंभीर होण्यापासून रोखता येऊ शकते. शस्त्रक्रियेपूर्वी योग्य तयारी, डॉक्टरांशी नियमित संवाद आणि रक्तातील साखरेची वेळोवेळी तपासणी केल्यास शस्त्रक्रियेची सुरक्षितता आणि रुग्णाची रिकव्हरी अधिक चांगली होण्यास मदत होते.”
Ans: रक्तातील साखर नियंत्रणात नसल्यास शस्त्रक्रियेनंतर संसर्ग आणि इतर धोका वाढू शकतो.
Ans: यामुळे संसर्गाचा धोका कमी होण्यास आणि जखम लवकर भरून येण्यास मदत होते.
Ans: रक्तातील साखरेची तपासणी आणि HbA1c चाचणीद्वारे मधुमेहाचे नियंत्रण तपासता येते.






