Rohit Sharma First Reaction After World Cup Final Lost : भारताचा कर्णधार रोहित शर्मा हा 19 नोव्हेंबर 2023 पासून गायब होता. तो ना माध्यमांना सामोरा गेला ना तो ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या टी 20 मालिकेत दिसला. 19 नोव्हेंबरला ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करत रोहितसह प्रत्येक भारतीयाचे ह्रदय तोडले होते.
जवळपास महिन्याभरानंतर या पराभवावर भाष्य
दरम्यान, रोहित शर्माने जवळपास महिन्याभरानंतर या पराभवावर भाष्य केलं आहे. तो इन्स्टाग्रावरील चर्चेत भावूक झाला होता. या पराभवातून बाहेर कसं यायचं हे त्याला कळतच नव्हतं असं तो म्हणाला. फायनलपर्यंत सगळं एकदम मनासारखं होत होतं. मात्र एका दिवसात होत्याचं नव्हतं झालं. त्याला यातून बाहेर पडणं खूप जड गेल्याचं तो म्हणाला.
रोहित शर्माने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर
रोहित शर्मा इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करून म्हणाला की, ‘मला बरेच दिवस कळतच नव्हतं की यातून कसं बाहेर पडायचं. काय करायचं असतं हेच मला कळत नव्हतं. माझे मित्र, कुटुंबाने मला पाठिंबा दिला अन् यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. माझ्या आसपासच्या सर्व गोष्टी हलक्या फुलक्या ठेवण्याचा त्यांनी प्रयत्न केला.’
तो पराभव पचवणं सोपं नव्हतं. मात्र आयुष्य पुढं सरकत राहतं. तुम्हाला आयुष्यात पुढं जात रहावं लागतं. मात्र खरं सांगायचं तर हे खूप कठिण आहे. असं पुढं जाणं सोपं नाही. मी वनडे वर्ल्डकप पाहतच मोठा झालो आहे. माझ्यासाठी वनडे वर्ल्डकपच सर्वात मोठा पुरस्कार होता.’
तुम्हाला अशी कामगिरी प्रत्येक वर्ल्डकपमध्ये दिसणार नाही
रोहित पुढे म्हणाला की, तुम्ही दुसरी बाजू पाहिली तर मला माझ्या संघाचा खूप अभिमान वाटतो. कारण त्यांनी संपूर्ण स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली. तुम्हाला अशी कामगिरी प्रत्येक वर्ल्डकपमध्ये दिसणार नाही.
जर तुम्ही लोकांना खूप आनंद दिला असेल, तुम्ही ती फायनल खेळल्याबद्दल अभिमान वाटत असेल तर गोष्टी अजूनच अवघड होतात. त्यामुळे मला वाटलं की हे सर्व सोडून कुठं तरी जावं. मात्र मी कोठेही असलो तरी लोकं माझ्याजवळ येत होती आणि संघाच्या कामगिरीची प्रशंसा करत होती. खरं तर पराभवाच्या नैराश्यातून बाहेर पडण्याची प्रेरणा मला यातूनच मिळाली.
मला अनेकवेळा वाटलं की जर कोणी मला विचारलं तुम्ही 10 पैकी 10 सामने तुम्ही जिंकला फायनलमध्ये काय चुकलं तर मी त्यांना सांगेन की आम्ही चुका केल्या मात्र आम्ही आमच्या परीने सर्वस्व दिलं. मात्र चुका प्रत्येक सामन्यात होतात. तुम्ही प्रत्येक सामन्यात एकसारखं खेळू शकत नाही.