बेथ मुनी-अलाना किंग(फोटो-सोशल मीडिया)
Beth Mooney-Alana King create history in an ODI : महिला एकदिवसीय विश्वचषकाचा नववा सामना काल म्हणजेच ०८ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलिया महिला संघ आणि पाकिस्तानी महिला संघात खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा १०७ धावांनी पराभव केला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या बेथ मुनी आणि अलाना किंग यांनी महिला एकदिवसीय विश्वचषकाच्या नवव्या सामन्यात इतिहास रचला. त्यांनी पाकिस्तानविरुद्ध नवव्या विकेटसाठी शतकी भागीदारी करून मैलाचा दगड गाठला. ही जोडी आता महिला एकदिवसीय सामन्यात नवव्या विकेटसाठी १०० पेक्षा जास्त धावांची भागीदारी रचणारी जगातील पहिली फलंदाज जोडी ठरली आहे.
आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ च्या पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात बेथ मुनी आणि अलाना किंग यांनी ऑस्ट्रेलियासाठी ९७ चेंडूत १०६ धावा जोडून मोठा पराक्रम केला आहे. नवव्या विकेटसाठी या शतकी भागीदारीसह त्यांनी अॅशले गार्डनर आणि किम गार्थ यांचा विक्रम मोडीत काढला आहे. एकदिवसीय सामन्यात नवव्या विकेटसाठी सर्वाधिक भागीदारीचा विक्रम अॅशले गार्डनर आणि किम गार्थ यांच्या नावावर जमा होता. ७ फेब्रुवारी २०२४ रोजी नॉर्थ सिडनी येथे खेळला गेलेल्या ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्या सामन्यातील ५० षटकांच्या सामन्यात गार्डनर आणि गार्थ यांनी ७७ धावांची भागीदारी केली होती.
बेथ मुनी आणि अलाना किंग यांची शतकी भागीदारी महिला एकदिवसीय विश्वचषकात ९व्या विकेटसाठीची सर्वोच्च भागीदारी ठरली आहे. महिला एकदिवसीय विश्वचषकात ९व्या विकेटसाठीची सर्वोच्च भागीदारी रचण्याचा याआधीचा विक्रम किम प्राइस आणि युलांडी व्हॅन डेर मेर्वे यांच्या नावे होता. ३० नोव्हेंबर रोजी क्राइस्टचर्च येथे २००० च्या विश्वचषक सामन्यात भारताविरुद्ध प्राइस आणि मेर्वे यांनी ९व्या विकेटसाठी नाबाद ६६ धावांचीभागीदारी रचली होती.
हेही वाचा : क्रिकेटवर अंडरवर्ल्डचे सावट! रिंकू सिंगला डी-कंपनीकडून धमकी; २ जणांना अटक
पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने ९ विकेट गमावून २२१ धावा उभ्या केल्या होत्या. ज्यामध्ये बेथ मुनीने १०९ धावांची शानदार शतकी खेळीचा समावेश आहे. तिच्याशिवाय अलाना किंगने ५१ धावांची नाबाद खेळी साकारली. पाकिस्तानकडून नाशरा संधूने ३, रमीन शामिलने २ आणि फातिमा साना यांनी २ विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात, या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ ११४ धावांवर गारद झाला. एकमेव सिद्रा अमीनने सर्वाधिक ३५ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून किम गार्थने ३, मेगन सटने २ आणि सदरलँडने २ बळी घेण्यात यश मिळवले.