
IND vs SA 5th T20I: Tilak Varma surpasses 'Hitman' Sharma! He became the first Indian to achieve this feat in T20s.
Tilak Varma broke Rohit Sharma’s record : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडवला. भारताने दिलेल्या २३१ धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिका संघ २०१ धावाच करू शकला आणि भारताने ३० धावांनी सामना जिंकून मालिका ३-१ अशी खिशात घातली. या सामन्यात भारतीय मधल्या फळीतील फलंदाज तिलक वर्माने ७३ धावांची खेळी केली. या खेळीसह तिलकने रोहित शर्माचा ४२९ धावांचा विक्रम मोडला आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० मध्ये भारताचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला.
रोहित शर्माने सप्टेंबर २००७ ते जून २०२४ पर्यंत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १८ टी-२० सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने एकूण ४२९ धावा केल्या आहेत. तर तिलकने आता आफ्रिकन संघाविरुद्ध १० टी-२० सामने खेळून ४९६ धावा केल्या आहेत. रोहित शर्माचा विक्रम मोडण्यासाठी तिलक वर्माला फक्त ७ धावांची गरज होती. त्याने सातव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर ही कामगिरी बाजवली. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० मध्ये सर्वाधिक धावा करणारा तो आता पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० मध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम इंग्लंडचा माजी कर्णधार आणि स्टार यष्टीरक्षक-फलंदाज जोस बटलरच्या नावावर जमा आहे. बटलरने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २३ टी-२० मध्ये ६०६ धावा फटकावल्या आहेत. जोस बटलरनंतर पाकिस्तानचा बाबर आझम आणि इंग्लंडचा जॉनी बेअरस्टो यांचा क्रमांक लागतो. या यादीमध्ये भारताचा तिलक वर्मा चौथ्या स्थानावर विजराजमान झाला आहे.
हेही वाचा : IND vs SA 5th t20I : हार्दिक पांड्याचा रोमॅंटिक अंदाज! अर्धशतक ठोकताच माहिका शर्माला दिला फ्लाइंग किस
दक्षिण आफ्रिका आणि भारत शुक्रवारी (१९ डिसेंबर) रोजी आमनसेमाने आले होते. या पाचव्या टी-२० सामन्यात तिलक वर्माने भारताकडून सर्वाधिक ७३ धावा केल्या. त्याने फक्त ४२ चेंडूत ७३ धावा केल्या. यामध्ये त्याने १० चौकार आणि १ षटकार मारला आणि हार्दिक पंड्यासोबत चौथ्या विकेटसाठी १०५ धावांची महत्वाची भागीदारी केली, त्याने २५ चेंडूत ५ चौकार आणि ५ षटकारांसह ६३ धावा फटकावल्या. या भागीदारीमुळे भारताने २० षटकांत २३१ धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेला फक्त २०१ धावाच करता आल्या. परिणामी भारताने हा सामना ३० धावांनी जिंकला. या विजयासह भारताने टी-२० मालिका ३-१ अशी जिंकली.