
टीम इंडियाने रचला इतिहास! मलेशियावर मात करत हॉकीत सुवर्णपदक; थेट 2028 ऑलिम्पिकमध्ये एन्ट्री
Asian Games 2026: भारतीय पुरुष हॉकी संघाने 2026 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत शानदार कामगिरी करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. शनिवारी (3 ऑक्टोबर) गिफू प्रीफेक्चरल ग्रीन स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या अंतिम सामन्यात भारताने मलेशियाचा 5-1 असा दणदणीत पराभव केला. या विजयासह भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेतील पुरुष हॉकीचे पाचवे सुवर्णपदक पटकावले आणि लॉस एंजेलिस 2028 ऑलिम्पिकसाठी पात्रता निश्चित केली.
विशेष म्हणजे 2026 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या सुवर्णपदकांची संख्या आता 21 झाली आहे. पुरुष आणि महिला अशा दोन्ही भारतीय हॉकी संघांनी एकाच आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याची ही पहिलीच वेळ ठरली. शुक्रवारी भारतीय महिला हॉकी संघाने सुवर्णपदक पटकावत LA 2028 ऑलिम्पिकचे तिकीट मिळवले होते.
अंतिम सामन्याच्या सुरुवातीपासूनच भारतीय संघाने आक्रमक खेळ केला. 11 व्या मिनिटाला भारताने पहिला गोल करत 1-0 अशी आघाडी घेतली. मात्र 14 व्या मिनिटाला मलेशियाने गोल करत सामना 1-1 असा बरोबरीत आणला. दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारताने पुन्हा सामन्यावर पकड मजबूत केली. 23 व्या मिनिटाला गुरजंत सिंगने गोल करत भारताला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर मलेशियाला पुनरागमनाची फारशी संधी मिळाली नाही.
तिसऱ्या क्वार्टरच्या 42 व्या मिनिटाला हार्दिक सिंगने गोल करत भारताची आघाडी 3-1 केली. चौथ्या क्वार्टरमध्ये भारतीय खेळाडूंनी मलेशियावरील दबाव आणखी वाढवला. 54 व्या मिनिटाला शिलानंद लाक्राने गोल करत स्कोअर 4-1 केला. त्यानंतर 57 व्या मिनिटाला कर्णधार हरमनप्रीत सिंगने गोल करत भारताच्या 5-1 अशा शानदार विजयावर शिक्कामोर्तब केले.
या विजयामुळे भारताने 2023 च्या हांगझू आशियाई क्रीडा स्पर्धेतील विजेतेपद कायम राखले. भारतीय पुरुष हॉकी संघाचे हे आशियाई क्रीडा स्पर्धेतील पाचवे सुवर्णपदक आहे. भारताने यापूर्वी 1966 बँकॉक, 1998 बँकॉक, 2014 इंचिओन आणि 2023 हांगझू येथे सुवर्णपदक जिंकले होते.
भारताने यंदाच्या स्पर्धेत सुरुवातीपासूनच वर्चस्व राखले. पूल A मध्ये इंडोनेशियावर 13-1, श्रीलंकेवर 16-1, दक्षिण कोरियावर 8-2, जपानवर 2-0 आणि बांगलादेशवर 10-0 असा विजय मिळवत भारतीय संघाने बाद फेरी गाठली. उपांत्य फेरीत मात्र पाकिस्तानने भारताला कडवी झुंज दिली. रोमहर्षक सामन्यात भारताने पाकिस्तानचा 4-3 असा पराभव करत अंतिम फेरीचे तिकीट मिळवले होते.
मलेशियानेही पूल B मध्ये दमदार कामगिरी केली होती. उझबेकिस्तानचा 7-0, ओमानचा 7-0 आणि थायलंडचा 10-0 असा पराभव करण्यासह पाकिस्तानवर 5-4 ने मात केली. उपांत्य फेरीत दक्षिण कोरियाला 2-1 ने नमवत मलेशियाने फायनल गाठली होती. मात्र सुवर्णपदकाच्या लढतीत भारतीय संघाने मलेशियाला वरचढ होण्याची संधी दिली नाही. 5-1 च्या विजयासह भारताने सुवर्णपदक, विजेतेपदाचे यशस्वी संरक्षण आणि LA 2028 ऑलिम्पिक पात्रता अशी तिहेरी कामगिरी नोंदवली.