भारताचे वेस्ट इंडिजवर वर्चस्व (Photo Credit - BCCI)
IND vs WI 1st Test 2025: भारत आणि वेस्ट इंडिज (IND vs WI) यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने (Team India) दुसऱ्या दिवसाअखेर पूर्णपणे वर्चस्व गाजवले आहे. केएल राहुल, ध्रुव जुरेल आणि रवींद्र जडेजा यांच्या शतकी खेळीमुळे भारताने पहिल्या डावात ५ बाद ४४८ धावा करत २८६ धावांची भक्कम आघाडी घेतली आहे. आता भारतीय संघ डावाने विजय मिळवण्यासाठी सज्ज असल्याचे चित्र आहे.
That’s Stumps on Day 2! 1⃣0⃣0⃣s from KL Rahul, Dhruv Jurel, and Ravindra Jadeja ✅#TeamIndia with a massive lead of 286 runs 💪 Scorecard ▶️ https://t.co/MNXdZceTab#INDvWI | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/cyPiBC6V4I — BCCI (@BCCI) October 3, 2025
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय वेस्ट इंडिजसाठी पूर्णपणे चुकला. भारतीय गोलंदाजांसमोर त्यांचा पहिला डाव अवघ्या ४४.१ षटकांत १६२ धावांवर संपुष्टात आला. वेस्ट इंडिजकडून जस्टिन ग्रीव्हजने सर्वाधिक ३२ धावा केल्या, तर शाई होप आणि कर्णधार रोस्टन चेस यांचा संघर्षही अपुरा पडला.
भारताकडून वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने प्राणघातक गोलंदाजी करत ४० धावांत चार बळी घेतले. त्याला जसप्रीत बुमराहने तीन बळी घेऊन शानदार साथ दिली. फिरकीपटू कुलदीप यादवने दोन, तर वॉशिंग्टन सुंदरने एक बळी घेतला.
वेस्ट इंडिजच्या १६२ धावांना प्रत्युत्तर देताना, भारतीय फलंदाजांनी दुसऱ्या दिवशी कॅरिबियन गोलंदाजांना अक्षरशः थकवून टाकले. युवा यष्टीरक्षक फलंदाज ध्रुव जुरेलने कारकिर्दीतील पहिले शानदार शतक झळकावले आणि १२५ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्याला केएल राहुलने संयमी १०० धावा करत चांगली साथ दिली. शुभमन गिल (५० धावा) यानेही अर्धशतकाचे योगदान दिले.
मात्र, दिवसाचा खेळ रवींद्र जडेजाच्या नावे राहिला. रवींद्र जडेजाने आपला प्रभावी फॉर्म कायम ठेवत नाबाद १०४ धावा केल्या आणि शतकांचा ‘षटकार’ पूर्ण केला. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा जडेजासह वॉशिंग्टन सुंदर (९*) धावांवर खेळत होता. भारताने घेतलेली २८६ धावांची मोठी आघाडी पाहता, आता तिसऱ्या दिवसाचा खेळ निर्णायक ठरू शकतो.