
Kabaddi Tournament : बीपीटीचा टायब्रेकरमध्ये सनसनाटी विजय; उपांत्य फेरीत वेस्टर्न रेल्वेशी लढत
शिवनेरी सेवा मंडळाच्या 58 व्या कबड्डी महोत्सवात (Kabaddi Tournament) व्यावसायिक गटात बीपीटीने टायब्रेकरमध्ये रिजनल स्पोर्ट्स बोर्डावर सनसनाटी विजय मिळवत उपांत्य फेरीत धडक मारली. बीपीटीसमोर आता उपांत्य फेरीत वेस्टर्न रेल्वेचे आव्हान असेल. दरम्यान, कुमार गटात गुड मॉर्निंग स्पोर्ट्स क्लबने, तर महिला गटात शिवशक्ती आणि विवेक महिला संघाने विजयी आगेकूच केली.
व्यावसायिक गटात बीपीटी आणि रिजनल स्पोर्ट्स बोर्ड यांच्यातील सामना 38-38 असा बरोबरीत सुटला. त्यानंतर झालेल्या टायब्रेकरमधील पाच-पाच चढायांमध्ये बीपीटीने 9-3 अशी बाजी मारली. बीपीटीकडून चढाईत जयेश महाजन, तर पकडीत आकाश अरसूल यांनी प्रभावी कामगिरी केली. रिजनल स्पोर्ट्स बोर्डकडून सुनील दुबळे आणि शंकर गदाई यांनी चांगला खेळ केला.
दुसऱ्या लढतीत वेस्टर्न रेल्वेने सेंट्रल रेल्वे डिव्हिजनचा 48-22 असा 26 गुणांनी पराभव केला. वेस्टर्न रेल्वेकडून चढाईत प्रणय राणे आणि पकडीत नितीन कुंभार यांनी विजयात महत्त्वाचे योगदान दिले.
मुंबई पोस्टलने सेंट्रल रेल्वेवर 39-12 असा 27 गुणांनी विजय मिळवला. मुंबई पोस्टलकडून सौरभ पाटील आणि ओंकार मोरे यांनी अनुक्रमे चढाई व पकडीत प्रभावी खेळ केला. अन्य सामन्यात बीपीसीएलने बीएमसीचा 45-32 असा 13 गुणांनी पराभव केला. बीपीसीएलकडून सौरभ राठोड आणि हर्ष लाड यांनी चमकदार कामगिरी केली.
टीम इंडियाचा फिनिशर रणजीतही चमकला! आधी बिहार, आता गोव्याविरुद्ध Rinku Singh ने ठोकलं खणखणीत शतक
कुमार गटाच्या उपांत्य फेरीत गुड मॉर्निंग स्पोर्ट्स क्लबने अंकुर स्पोर्ट्स क्लबचा 38-29 असा 9 गुणांनी पराभव केला. गुड मॉर्निंगकडून चढाईत निलेश मोरे आणि पकडीत आदित्य धुमाळ यांनी चांगला खेळ केला.
महिला गटाच्या उपांत्य फेरीत शिवशक्ती महिला संघाने मुंबई पोलीस महिला संघावर 39-29 अशी 10 गुणांनी मात केली. शिवशक्तीकडून शुभदा खोत आणि साधना विश्वकर्मा यांनी विजयात मोलाचे योगदान दिले.
दुसऱ्या उपांत्य सामन्यात विवेक महिला संघाने शिरोडकर स्पोर्ट्स क्लबचा 34-24 असा 10 गुणांनी पराभव केला. विवेककडून चढाईत हरजीत संधू आणि पकडीत स्विटी यांनी प्रभावी कामगिरी केली.