Kabbadi : निवड चाचणी स्पर्धेत संघर्ष मंडळ, श्री स्वामी समर्थ मंडळाची विजयी सलामी
संघर्ष मंडळ, उजाला, रॅडीकल स्पोर्ट्स, ओम् संघ, श्री स्वामी समर्थ यांनी ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनने विजय मंडळाच्या सहकार्याने आयोजित केलेल्या कुमार गट कबड्डी (Kabbadi) स्पर्धेत पहिल्या साखळी विजयाची नोंद केली.
वाशिंदच्या जय बजरंगने दोन्ही सामने जिंकत बाद फेरी गाठली आहे. भिवंडी, काल्हेर येथील विजय मंडळाच्या पटांगणावर सुरू असलेल्या कुमारांच्या ‘अ’ गटात संघर्ष मोहने संघाने ग्रीफिन जिमला 25-24 असे चकविले. मध्यंतरला 12-09 अशी आघाडी घेणाऱ्या संघर्षने नंतर सावध खेळ करीत हा निसटता विजय मिळविला.
हर्ष साळुंखे, मंथन सोनकर यांच्या संयमी व धोरणात्मक खेळाला याचे श्रेय जाते. ग्रीफिनच्या आशिष धनावडे, श्रेयस पवार यांनी शेवटच्या क्षणापर्यंत निकराची लढत दिली.
उजाला संघाने ‘ड’ गटात पूर्वार्धातील 05-11 अशा पिछाडीवरून वास्को स्पोर्ट्सचा 18-15 असा पाडाव केला. जावेद व एजाज या चौधरी बंधुच्या आक्रमक खेळाला याचे श्रेय जाते. वास्कोच्या मयुरेश वाघ, सुजल गायकर यांचा खेळ उत्तरार्धात कमी पडला.
तसेच ओम् संघाने ‘क’ गटात छत्रपती शाहू संघावर 27-22 असा विजय मिळविला. यग्नेश भोपी, प्रसाद यांच्या चढाई, पकडीच्या खेळाने त्यांनी ही किमया केली. छत्रपती शाहूच्या सुगंध राजभर याने एकाकी लढत दिली. रॅडीकल स्पोर्ट्सने ‘ई’ गटात ओम् वर्तक ठाणे संघाचा 29-25 असा पराभव केला. साई ठाकूर, यश म्हात्रे विजयी संघाकडून, तर यश कदम, सार्थक खाडे पराभूत संघाकडून उत्कृष्ट खेळले.
जय बजरंग संघाने बाद फेरी गाठताना प्रथम वीर तानाजीचा 36-15 असा, तर नंतर बालगोपाळ मंडळाचा 36-18 असा पाडाव केला. नेहाला गायकर, आशिष सुतार, जयेश गायकवाड यांच्या चतुरस्त्र खेळाने हे दोन्ही विजय सोपे झाले. श्री विठ्ठल मंडळाने देखील ‘ज’ गटात दोन विजय मिळवीत बाद फेरी गाठली.
श्री विठ्ठल संघाने प्रथम वेताळ मंडळाला 28-26 असे नमवीत, तर नंतर विश्वविधाता मंडळावर 30-09 अशी मात करीत बाद फेरी गाठली. निलेश मांडगे, कार्तिक बाटे, उमाकांत खाडे, ओमकार यांच्या खेळाने हे शक्य झाले.
Carrom Tournament : महापौर शालेय कॅरम स्पर्धेत केवल कुळकर्णी विजेता






