नीरज चोप्रा(फोटो-सोशल मीडिया)
Doha Diamond League 2025 : भारत देशासाठी दोन वेळा ऑलिंपिक पदक विजेता ठरलेला भालाफेकपटू नीरज चोप्राने शुक्रवारी त्याच्या डायमंड लीग मोहिमेची सुरुवात एक इतिहास रचत केली आहे. नीरज चोप्राने अखेर तो पराक्रम गाजवला ज्याची आशा लावून संपूर्ण देश त्याच्याकडे डोळे लावून बसला होता. दोहा डायमंड लीग २०२५ मध्ये, नीरज चोप्राने ९०.२३ मीटर भालाफेक करून एक नवीन राष्ट्रीय विक्रम केला आहे. तसेच चोप्राने कारकिर्दीत पहिल्यांदाच ९० मीटरचा टप्पा देखील पार केला आहे. नीरज ने करून दाखवलेली ही दमदार कामगिरी त्याच्या कारकिर्दीतील सर्वात मोठी झेप तर ठरली आहेच, या सोबतच भारतीय अॅथलेटिक्सच्या इतिहासातील एक मैलाचा दगड देखील ठरली आहे. नीरजने फेकलेल्या थ्रोने त्याने सर्व दिग्गजांना मागे टाकत पहिले स्थान पटकावून डायमंड लीग शर्यतीत मोठी आघाडी घेतली आहे.
हेही वाचा : मुंबई T20 लीगचे वेळापत्रक बदलले! आता 4 जूनपासून स्पर्धा होणार
नीरज चोप्राचा मागील सर्वोत्तम थ्रो त्याने २०२२ मध्ये स्टॉकहोम डायमंड लीगमध्ये ८९.९४ मीटर फेकला होता. यावेळी दोहामध्ये, त्याने पहिल्या प्रयत्नात ८८.४४ मीटरने सुरुवात केली होती आणि तिसऱ्या प्रयत्नात ९०.२३ मीटरचा ऐतिहासिक थ्रो करून मैदानावर आपला दबदबा राखला. किशोर जेना याने देखील यांनीही या स्पर्धेत भाग घेतला होता पण त्यांना पहिल्या पाचमध्ये स्थान मिळवता आलेले नाही. नीरजने मिळवलेला हा विजय पॅरिस ऑलिंपिकपूर्वीच्या त्याच्या तयारीचा एक मजबूत असा संकेत देतो.
नीरज ९० मीटर क्लबमध्ये सामील होणारा पहिला भारतीय
नीरज चोप्राने तिसऱ्या प्रयत्नात ९०.२३ मीटर फेकून इतिहास घडवला आहे. भालाफेकीत एखाद्या भारतीयाने हे अंतर पार करण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. यापूर्वी त्याची सर्वोत्तम कामगिरी ८९.९४ मीटर राहिली होती. नीरजच्या या यशामुळे त्याने डायमंड लीगच्या या टप्प्यात ८ गुणांची कमाई केली आहे. जर्मनीचा ज्युलियन वेबर ८९.०६ मीटर फेकून दुसऱ्या स्थानावर राहिला.
हेही वाचा : RCB vs KKR : विराट कोहलीच्या जर्सीची विक्री अचानक का वाढली? आरसीबी चाहत्यांमध्ये स्पर्धा, जाणून घ्या प्रकरण
नीरजसोबत स्पर्धा करणाऱ्या भारतीय किशोर जेनाचा सर्वोत्तम थ्रो ७८.६० मीटर राहिला होता. पहिल्या प्रयत्नात त्याने ६८.०७ मीटर थ्रो फेकला, दुसऱ्या प्रयत्नात सुधारणा झाली पण तिसऱ्या प्रयत्नात तो फाऊल ठरला. त्याला या स्पर्धेत आठव्या स्थानावर समाधान मानावे लागले. त्याच्या कामगिरीवरून हे स्पष्ट होते की जागतिक अजिंक्यपद स्पर्धेपूर्वी त्याला त्याच्या थ्रोमध्ये सातत्य आणावे लागणार आहे.