महाडर्ट ट्रॅक चॅलेंजमध्ये सार्थक चव्हाणचा दबदबा
या संपूर्ण भव्य स्पर्धेची धुरा आयोजक शीतल राठोड यांनी समर्थपणे पेलली होती. एका महिला आयोजकाने जिद्द, अचूक नियोजन आणि कठोर परिश्रमांच्या बळावर अशा आव्हानात्मक मोटारसायकल रेसिंग इव्हेंटचे यशस्वी आयोजन करून एक नवा आदर्श घालून दिला आहे. पुरुषप्रधान मानल्या जाणाऱ्या मोटारस्पोर्ट्ससारख्या साहसी क्षेत्रात महिलाही प्रभावी नेतृत्व करू शकतात, हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले. या आयोजनात त्यांच्या संपूर्ण टीमनेही मोलाची साथ दिली.
थरार, वेग आणि कौशल्याची जुगलबंदी! ३८ व्या पुणे फेस्टिव्हलच्या ‘Dirt track’ मध्ये रायडर्सचा धुमाकूळ
स्पर्धेतील प्रीमियम क्लासमध्ये सार्थक चव्हाणने आपल्या अद्वितीय रायडिंग तंत्राची चुणूक दाखवत तीनही क्लासमध्ये थेट विजेतेपद पटकावले. या स्पर्धेतील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे प्रतिस्पर्धी रायडर्स ४५० सीसी क्षमतेच्या शक्तिशाली मोटारसायकली चालवत असताना, सार्थकने अवघ्या ३०० सीसी क्षमतेच्या मोटारसायकलवर रेस केली. कमी क्षमतेचे इंजिन असूनही त्याने दाखवलेला प्रचंड वेग, वळणांवरील उत्कृष्ट नियंत्रण आणि कौशल्याच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांवर मोठी आघाडी घेत विजय खेचून आणला. त्याच्या या सातत्यपूर्ण आणि अष्टपैलू कामगिरीसाठी त्याला स्पर्धेतील ‘बेस्ट रायडर’ या सर्वोच्च किताबाने सन्मानित करण्यात आले.
सार्थकसोबतच त्याचा भाऊ दर्शित चव्हाण यानेही ट्रॅकवर शानदार प्रदर्शन करत आपल्या गटात तिसरा क्रमांक पटकावला. या दोन्ही भावांच्या चमकदार कामगिरीमुळे मोटरस्पोर्ट्स विश्वात चव्हाण कुटुंबाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. याशिवाय स्पर्धेतील विविध गटांमध्ये जिब्रान शेख, जिरेंदर सांगवी आणि लोकेश भोसले यांनीही आपापल्या क्लासमध्ये दमदार कामगिरी करत विजेतेपद पटकावून स्पर्धेची चुरस वाढवली.
याला म्हणतात पॅशन! निकेतची वादळी शतकी खेळी; Spartan Monsoon League मध्ये टायटन बुल्स्चा थरारक विजय
विजयानंतर भावना व्यक्त करताना सार्थक चव्हाण म्हणाला, “महा डर्ट ट्रॅक चॅलेंजचे आयोजन अत्यंत नियोजनबद्ध आणि दर्जेदार झाले. अशा प्रकारच्या स्पर्धांमुळे युवा रायडर्सना आपली क्षमता सिद्ध करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होते.” या वेळी सार्थकने मुख्य आयोजक शीतल राठोड, उमेश निर्मळ, ‘एक्स्ट्रीम मोटरस्पोर्ट्स अँड रेसिंग’ची संपूर्ण टीम तसेच सपोर्टिंग आयोजक असलेल्या कोल्हापूरच्या ‘रॉयल रोडिओ’चे मनापासून आभार मानले.शीतल राठोड यांचे कणखर नेतृत्व, उत्कृष्ट व्यवस्थापन आणि सर्व सहयोगी संस्थांच्या सहकार्यामुळे पार पडलेल्या या ‘महा डर्ट ट्रॅक चॅलेंज’ स्पर्धेने राज्यातील मोटारस्पोर्ट्स क्षेत्रात आपली एक वेगळी आणि दर्जेदार छाप सोडली आहे.






