Jalgaon News: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
Pune Darbhanga Special Trains 2026: जळगाव (वा.) सणासुदीच्या काळात प्रवाशांची वाढणारी गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने हडपसर (पुणे) ते दरभंगा दरम्यान विशेष रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या मार्गावर एकूण चार विशेष फेऱ्या होणार असून, यामुळे पुणे आणि उत्तर भारतादरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
विशेष म्हणजे, या गाड्यांना जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, पाचोरा आणि भुसावळ या तीन महत्त्वाच्या रेल्वेस्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. गाडी क्रमांक ०५५३४ हडपसर-दरभंगा विशेष रेल्वे १९ आणि २६ नोव्हेंबर २०२६ रोजी हडपसर येथून सकाळी १० वाजता सुटणार आहे. प्रवासादरम्यान विविध स्थानकांवर थांबत ही गाडी दुसऱ्या दिवशी रात्री ११.३० वाजता दरभंगा येथे पोहोचणार आहे. Jalgaon News:
या गाडीच्या दोन फेऱ्यांमुळे पुणे परिसरातून विहारकडे जाणाऱ्या प्रवाशांना अतिरिक्त प्रवास सुविधा उपलब्ध होणार आहे. परतीच्या दिशेने गाडी क्रमांक ०५५३३ दरभंगा-हडपसर विशेष रेल्वे १७ आणि २४ नोव्हेंबर २०२६ रोजी दरभंगा येथून सायंकाळी ७.३० वाजता सुटणार आहे. ही गाडी तिसऱ्या दिवशी सकाळी ७.४० वाजता हडपसर येथे पोहोचणार आहे.
या गाडीच्या दोन फेऱ्यांमुळे बिहारमधून पुण्याकडे येणाऱ्या प्रवाशांनाही अतिरिक्त रेल्वे सुविधा मिळणार आहे. या विशेष रेल्वेगाड्यांना महाराष्ट्रातील दौंड कॉर्ड लाइन, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा आणि भुसावळ येथे थांबे देण्यात आले आहेत.
विशेष रेल्वेगाड्यांना एकूण २२ डबे असणार आहेत. त्यामध्ये एक वातानुकूलित द्वितीय श्रेणी, चार वातानुकूलित तृतीय श्रेणी, तीन वातानुकूलित तृतीय श्रेणी इकॉनॉमी, सात शयनयान श्रेणी आणि पाच सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे असतील. याशिवाय एक द्वितीय श्रेणी आसनयुक्त सह गार्ड ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटरसह गार्ड व्हॅन जोडण्यात येणार आहे. त्यामुळे विविध आर्थिक स्तरांतील प्रवाशांना त्यांच्या सोयीनुसार प्रवासाचे पर्याय उपलब्ध होतील.
याशिवाय मध्य प्रदेशातील खंडवा, इटारसी, पिपरिया, नरसिंगपूर, जबलपूर, कटनी, सतना, उत्तर प्रदेशातील प्रयागराज छिवकी आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय तसेच बिहारमधील बक्सर, आरा, पाटलीपुत्र, हाजीपूर, सोनपूर आणि मुजफ्फरपूर या स्थानकांवरही गाड्या थांबणार आहेत.
Jalgaon News: सणांचा उत्साह अन् बसस्थानक हाऊसफुल्ल! एरंडोल आगाराची 10 लाखांच्या कमाईकडे झेप
जिल्ह्यातील चाळीसगाव, पाचोरा आणि भुसावळ या स्थानकांवर थांबे मिळाल्याने या परिसरातील प्रवाशांना पुणे तसेच उत्तर भारतातील विविध शहरांपर्यंत जाणे सोयीचे होणार आहे. विशेषतः उत्तर भारतात जाणाऱ्या आणि तेथून महाराष्ट्रात परतणाऱ्या प्रवाशांना या अतिरिक्त रेल्वेगाड्यांचा लाभ घेता येणार आहे.
Ans: गाडी क्रमांक 05534 हडपसर-दरभंगा विशेष रेल्वे 19 आणि 26 नोव्हेंबर 2026 रोजी धावणार आहे.
Ans: गाडी क्रमांक 05533 दरभंगा-हडपसर विशेष रेल्वे 17 आणि 24 नोव्हेंबर 2026 रोजी दरभंगा येथून सायंकाळी 7.30 वाजता सुटणार आहे.
Ans: चाळीसगाव, पाचोरा आणि भुसावळ या तीन रेल्वेस्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.






