ऋषभ पंतची भावूक पोस्ट (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
टीम इंडियाचा स्टार फलंदाज ऋषभ पंतच्या शौर्याची सर्वत्र चर्चा होत आहे. मँचेस्टरमधील चौथ्या कसोटीत तो योद्ध्यासारखा लढला. पंतने प्रचंड वेदनेने मैदानात प्रवेश केला आणि सध्या तो या मालिकेतून बाहेर आहे. सामन्यानंतर त्याने आता इंस्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. पायाला फ्रॅक्चर झाल्यामुळे पंत क्रॅचवर आहे, परंतु पुन्हा एकदा कसोटी क्रिकेटमध्ये परतण्यासाठी तो उत्सुक आहे.
ऋषभ पंतच्या शौर्याला सर्व जगाने सलाम केला. ४ थ्या कसोटीत ऋषभच्या पायाला जबरदस्त दुखापत झाल्यानंतरही तो डाव खेळण्यासाठी पुन्हा मैदानावर उतरला आणि देशप्रेम पहिले हेच त्याने दाखवून दिले. इतकंच नाही तर इतक्या दुखापतीनंतर त्याने डाव सावरायला मदत केली आणि व्यक्तीगतरित्या ५० रन्सदेखील पूर्ण केले. संपूर्ण जग सध्या ऋषभच्याच नावाची चर्चा करत असल्याचे दिसत आहे. तर त्याने या दुखापतीबाबत सोशल मीडियावर अपडेट्स दिले आहे (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
कशी झाली दुखापत?
भारताच्या पहिल्या डावात ऋषभ पंतला दुखापत झाली. क्रिस वोक्सचा एक चेंडू त्याच्या पायाला लागला, ज्यामुळे त्याच्या पायातून रक्तही येऊ लागले. पंतला चालणे कठीण झाले, पण तरीही त्याने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंत वेदनांसह मैदानात आला आणि त्याने शानदार अर्धशतकी खेळी केली. तथापि, त्याने दुसऱ्या डावात फलंदाजी केली नाही आणि भारताने सामना अनिर्णित ठेवला. ऋषभ पंतला रविंद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदरच्या जोडीची चांगली साथ लाभली आणि इंग्लंडचे जिंकायचे स्वप्न भारताने धुळीला मिळवले.
ऋषभची भावूक पोस्ट
ऋषभ पंतने इंस्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. तो परतण्यासाठी उत्सुक दिसत आहे. त्याने लिहिले, ‘मला मिळालेल्या सर्व प्रेम आणि शुभेच्छांसाठी मी आभारी आहे. हे खरोखरच माझ्यासाठी शक्तीचा स्रोत आहे. माझे फ्रॅक्चर बरे झाल्यानंतर मी पुन्हा खेळायला सुरू करेन आणि मी हळूहळू सध्याच्या स्थितीशी जुळवून घेईन. मी धीर धरेन, दिनचर्येचे पालन करेन आणि माझे १००% देईन. देशासाठी खेळणे हा माझ्या आयुष्यातील नेहमीच अभिमानाचा क्षण राहिला आहे. मला आवडणारे काम पुन्हा करण्यासाठी मी उत्सुक आहे.’
India vs England 4th Test : सुनील गावस्कर यांनी बेन स्टोक्सला धरलं धारेवर! तू असं का केलंस…
उत्तम फॉर्ममध्ये पंत
या मालिकेत ऋषभ पंत उत्तम फॉर्ममध्ये होता. त्याने पहिल्या कसोटीच्या दोन्ही डावात शतक झळकावले. दुसऱ्या कसोटीतही त्याने अर्धशतक झळकावले. तिसऱ्या सामन्याच्या पहिल्या डावात त्याने ५४ धावा केल्या. त्यानंतर चौथ्या सामन्यात त्याने ५४ धावा केल्या. शेवटच्या कसोटीत त्याच्या जागी जगदीशनचा समावेश करण्यात आला आहे.