सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी(फोटो-सोशल मीडिया)
Hong Kong Open Badminton Tournament : हाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताची पुरुष दुहेरीतील जोडी सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी उपांत्य फेरीत स्थान पक्क केले आहे. उपांत्यपूर्व फेरीतील अटीतटीच्या सामन्यात त्यांनी मलेशियाच्या जोडीचा २-१ ने पराभव केला. हा सामना तब्बल एक तास चालला. हाँगकाँग ओपन २०२५ मध्ये, भारताची सध्याची सर्वोत्तम पुरुष बॅडमिंटन जोडी सात्विक आणि चिराग यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
उपांत्यपूर्व फेरीत त्यांचा सामना मलेशियाच्या जुनैदी आरिफ आणि रॉय किंग यप यांच्याशी झाला. तीन सेटपर्यंत चाललेल्या या रोमहर्षक सामन्यात भारतीय जोडीने २-१ असा विजय मिळवून उपांत्य फेरीत आपले स्थान पक्के केले. आता उपांत्य फेरीत त्यांचा सामना चिनी तैपेईच्या जोडीशी होणार आहे. तीनही सेटमध्ये चुरशीची लढत हाँगकाँग ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात सात्विक चिराग जोडीला मलेशियाच्या जोडीकडून कडवी झुंज मिळाली.
हेही वाचा : ‘विश्वचषकापूर्वी भारतीय संघाची ऑस्ट्रेलियाविरुद्ध अग्निपरीक्षा’, मुख्य प्रशिक्षकांकडून आगामी रणनीती स्पष्ट
पहिल्या सेटमध्ये त्यांनी २१-१४ अशा गुणांनी विजय मिळवून सामन्यात १-० अशी आघाडी घेतली. मात्र, दुसऱ्या सेटमध्ये मलेशियाच्या जोडीने दमदार पुनरागमन करत तो २२-२० ने जिंकला आणि सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली. तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्ये सात्विक आणि चिराग यांनी वर्चस्व गाजवत २१-१६ अशा गुणांनी विजय मिळवला आणि उपांत्य फेरीत धडक मारली. उपांत्य फेरीत आता भारतीय जोडीचा सामना चेन चेंग कुआन आणि लिन बिंग वेई या चिनी तैपेईच्या जोडीशी होईल.
भारतीय संघ महिला हॉकी आशिया कपमध्ये दमदार कामगिरी करताना दिसत आहे. महिला हॉकी संघाने आशिया कपच्या अंतिम फेरीत धडक मारून विजेतपदाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे. भारताने सुपर-४ च्या शेवटच्या सामन्यात भारताने जपानसोबत १-१ अशी बरोबरी साधून अंतिम फेरीत धडक मारली आहे. चीनविरुद्धच्या निराशाजनक पराभवानंतर, भारतीय महिला संघाने दमदार खेळ दाखवत महिला हॉकी आशिया कप २०२५ च्या त्यांच्या शेवटच्या सुपर ४ सामन्यात गतविजेत्या जपानविरुद्ध पुनरागमन केले आणि सामना १-१ असा बरोबरीत सोडवण्यात यश मिळवळे. या बरोबरीसह भारताने जपानला अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर फेकले आहे.