सौजन्य - नवराष्ट्र टीम
पिंपरी : बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काँग्रेस पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रींचा अवमान केल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाने आज पिंपरी-चिंचवडमध्ये जोरदार आंदोलन केले आहे. “स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी” या भारतीय संस्कृतीच्या मूल्यांवर आघात करणाऱ्या काँग्रेसच्या विचारधारेचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले आहे, असं भाजपकडून सांगितले. शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे आणि महिला मोर्चा अध्यक्षा सुजाता पालांडे यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी येथील भाजपा पक्ष कार्यालयाजवळ सकाळी १० वाजता आंदोलन पार पडले. कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत काँग्रेसविरोधात संताप व्यक्त केला. या आंदोलनात शहरातील भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विशेषतः महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग होता.
“काँग्रेसची विचारधारा नेहमीच विष पेरणारी असून, ती नारीशक्तीचा अवमान करणारी आहे. पंतप्रधान हे देशाचे असतात आणि त्यांच्या आईबद्दल अपशब्द वापरणे किंवा त्यांचे वाईट पद्धतीने चित्रण करणे हा देशातील सर्व मातांचा अपमान आहे. ही मातृशक्ती कधीही सहन करणार नाही,” असे प्रतिपादन शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी आंदोलनावेळी केले. या आंदोलनातून काँग्रेसच्या कृत्याचा तीव्र निषेध करण्यात आला.
तसेच “मातृशक्तीचा अनादर सहन केला जाणार नाही” असा ठाम संदेश देत, जनतेलाही मातृशक्तीच्या सन्मानासाठी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले. शहरातील विविध भागामधून देखील आंदोलने पार पडल्याने काँग्रेसविरोधात संतापाचे वातावरण दिसून आले. भाजपाच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून काँग्रेस पक्ष कार्यालयात बांगड्या पाठविण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
या वेळी संघटन सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, सरचिटणीस वैशाली खाडये, सरचिटणीस मधुकर बच्चे, उपाध्यक्ष राम वाकडकर, राजू दुर्गे, युवा मोर्चा अध्यक्ष दिनेश यादव, प्रवक्ते कुणाल लांडगे, अजित बुर्डे, रमेश वहिले, विजय शिणकर, राजेंद्र बाबर, मंडल अध्यक्ष सोमनाथ तापकीर, मोहन राऊत, गणेश ढोरे, अनिता वाळुंजकर, नामदेव पवार, हरीश मोरे, इंजी. संतोष भालेराव, डॉ. अमित नेमाने, अंकुश शिर्के, अतुल गाडगे, सुनील लांडगे, संतोष टोणगे, सचिन राऊत, खंडूदेव कठारे, ॲड. हर्षद नढे, ॲड. गोरख कुंभार, ॲड. युवराज लांडे, सागर बिरारी यांच्यासह शहरातील अनेक पदाधिकारी व महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.