‘स्पोर्ट्सफिल्ड मान्सून लीग’ (फोटो- सोशल मिडिया)
सातारा रस्त्यावरील टेंभेकर फार्म्स क्रिकेट मैदानावर रंगलेल्या या लढतींमध्ये विजय क्रिकेट ॲकॅडमी आणि स्पेशलाईज्ड क्रिकेट क्लिनिकच्या खेळाडूंनी प्रतिस्पर्ध्यांवर एकतर्फी वर्चस्व गाजवले. पहिल्या लढतीत समर्थ जाधवच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर विजय क्रिकेट ॲकॅडमीने आर्यन्स क्रिकेट ॲकॅडमीवर ८३ धावांनी दणदणीत विजय मिळवून अंतिम चार संघांत आपले स्थान निश्चित केले. प्रथम फलंदाजी करताना विजय क्रिकेट ॲकॅडमीने फलंदाजांच्या सांघिक योगदानाच्या बळावर १८६ धावांचे आव्हानात्मक लक्ष्य उभे केले. यामध्ये समर्थ जाधवने सर्वाधिक ४४ धावांचे योगदान दिले. त्याला श्रवण धुमाळ (३६ धावा), सचिन बोरा (३३ धावा) आणि विहान ताकवले (२६ धावा) यांनी सुरेख साथ दिली.
Asian Games 2026: बांग्लादेशला ‘हुतुतू’ समजेना! भारतीय कबड्डी संघाचा दणदणीत विजय
आर्यन्स ॲकॅडमीकडून गोलंदाजीत रिवान तिबरेवालने प्रभावी मारा करत पाच फलंदाजांना तंबूत धाडले. प्रत्युत्तरादाखल १८७ धावांचा पाठलाग करताना आर्यन्स क्रिकेट ॲकॅडमीचा डाव २०.५ षटकांत अवघ्या १०३ धावांवर संपुष्टात आला. रिशीक गुहाने केलेली २५ धावांची झुंज वगळता इतर फलंदाज अपयशी ठरले. विजय संघाकडून गोलंदाजीत मानव सोळंकी आणि समर्थ जाधव यांनी प्रत्येकी तीन गडी बाद करत प्रतिस्पर्ध्यांचे कंबरडे मोडले, तर ऋषीकेश एस. याने दोन बळी घेत विजयावर शिक्कामोर्तब केले.
दुसऱ्या सामन्यात स्टीफन शिरोडकरच्या फटकेबाजीच्या जोरावर स्पेशलाईज्ड क्रिकेट क्लिनिकने क्रिकेट नेक्स्ट ॲकॅडमीचा ५ गडी राखून पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या क्रिकेट नेक्स्ट ॲकॅडमीने निर्धारित षटकांत १७७ धावांचे लक्ष्य उभे केले. त्यांच्याकडून अव्देत इप्पे (४९ धावा), ओजस वाईकर (४५ धावा) आणि विवान देशमुख (३५ धावा) यांनी डावाला आकार दिला. १७८ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या स्पेशलाईज्ड क्रिकेट क्लिनिकने २८.४ षटकांत विजय साकारला. विजयाचा शिल्पकार ठरलेल्या स्टीफन शिरोडकरने केवळ ५४ चेंडूंत ६ चौकार आणि ६ उत्तुंग षटकारांच्या मदतीने नाबाद ९६ धावांची तुफानी खेळी केली. त्याला दुसऱ्या बाजूने कार्तिक पासलकरने नाबाद ४० धावांची संयमी साथ देत संघाचा विजय सुकर केला.
याला म्हणतात पॅशन! निकेतची वादळी शतकी खेळी; Spartan Monsoon League मध्ये टायटन बुल्स्चा थरारक विजय






