गीत मालुसरे (फोटो- सोशल मिडिया)
गीता मालुसरेने जगातील सात प्रमुख ओपन वॉटर स्विम्स पूर्ण करून ‘क्वीन ऑफ ओशन’ हा बहुमान मिळविण्याचे ध्येय ठेवले आहे. या मोहिमेतील पहिला टप्पा तिने इंग्लिश चॅनेल पार करून पूर्ण केला. त्यानंतर अमेरिकेतील कॅटालिना चॅनेल त्यांनी १५ तास ४२ मिनिटांत पार केला. कॅटालिना चॅनेल पूर्ण करणारी ती भारतातील पाचवी महिला ठरली होती. त्यानंतर न्यूयॉर्कमधील मॅनहॅटन बेटाभोवतीची सुमारे ४६ किलोमीटरची ‘२० ब्रिजेस स्विम’ तिने ९ तास ३२ मिनिटांत पूर्ण केली. या तीनही आव्हानात्मक जलतरण मोहिमा ९६ दिवसांच्या कालावधीत पूर्ण करत त्यांनी ‘ओपन वॉटर स्विमिंग ट्रिपल क्राउन’ आपल्या नावावर केला.
जेलीफिशचा दंश, हाताला दुखापत; तरीही माघार नाही
या मोहिमेदरम्यान गीताला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. इंग्लिश चॅनेलच्या जलतरणादरम्यान त्यांना जेलीफिशचा दंश झाला. त्यानंतरही तयारी सुरू ठेवत ती पुढील आव्हानांना सामोरे गेली. कॅटालिना चॅनेलच्या जलतरणादरम्यान दोन्ही हातांना दुखापत झाली. मात्र, अनेक महिन्यांची तयारी, घेतलेले कष्ट आणि या मोहिमेचे ध्येय लक्षात घेता त्यांनी माघार घेतली नाही.
माघार घेण्याचा प्रश्नच नव्हता
“प्रत्येक स्विमने मला नवा धडा दिला आणि मानसिकदृष्ट्या अधिक मजबूत केले. या प्रवासातील वेदना, त्याग आणि अडचणी असूनही माघार घेण्याचा प्रश्नच नव्हता,” असे गीताने सांगितले. या कामगिरीसाठी कुटुंबीयांनी दिलेल्या पाठिंब्याचे त्यांनी विशेष उल्लेख केला. वडील, आई, आजी आणि कुटुंबीयांच्या पाठिंब्यामुळे हा प्रवास शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले. प्रशिक्षक प्रतीक जावडेकर आणि शेखर खासनीस यांनी दिलेल्या मार्गदर्शनाबद्दलही तिने कृतज्ञता व्यक्त केली.
पाण्याचा प्रवाह देखील झुकला! अवघ्या १३व्या वर्षी ८१ किलोमीटरचा जलप्रवास; विदी भोरने 11 तास अन्…
‘२० ब्रिजेस स्विम’साठी प्रायोजकत्व दिल्याबद्दल वेंकीज (Venkys) आणि क्रांती रिअल्टर्स यांचे त्यांनी आभार मानले. तसेच अमेरिकेतील मोहिमेदरम्यान मदत करणाऱ्या प्रीती सावंत जाधव, सुदीप जाधव, राजवीर जाधव, कौस्तुभ हळबे आणि वैष्णवी कुडले यांचेही त्यांनी आभार व्यक्त केले. “हे यश केवळ माझे नाही. माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या अनेकांचे प्रेम, त्याग, प्रोत्साहन आणि पाठिंबा यामुळे हा प्रवास शक्य झाला,” अशी भावना गीता मालुसरे यांनी व्यक्त केली.






