सनरायझर्स लीड्सची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. डावाच्या सुरुवातीलाच फोबी लिचफिल्डने सामंथा बेट्सच्या गोलंदाजीवर एक चौकार आणि एक षटकार मारून काही आशा निर्माण केल्या. परंतु, किम गार्थने बायर्न स्मिथ आणि लॉरेन विनफिल्ड-हिल यांना सलग दोन चेंडूंवर बाद केले. लिचफिल्डही फार काळ टिकली नाही, त्यामुळे सनरायझर्सची धावसंख्या २४/३ झाली. त्यानंतर अॅनाबेल सदरलँड आणि भारतीय अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्मा यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्यांनी ३२ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करून संघाला वाईट परिस्थितीतून बाहेर काढले. मात्र, दीप्ती बोल्ड झाल्यानंतर सनरायझर्सचा डाव पुन्हा डगमगला. चार चेंडूंनंतर जॉर्जिया अॅडम्सने सदरलँडला स्टम्प आऊट केले. तीन चेंडूंनंतर जेस जोनासेन शून्यावर धावबाद झाली. त्यानंतर विकेट्स पडण्याचा सत्र सुरुच राहिला. त्यानंतर, सामंथा बेट्सही बाद झाली. डॅनियल गिब्सनने चार चौकारांच्या मदतीने संघाची धावसंख्या शंभरच्या जवळ नेण्याचा प्रयत्न केला, पण रॉकेट्सच्या गोलंदाजांनी एकामागून एक विकेट्स घेतल्या आणि संपूर्ण संघ ९१ धावांवर सर्वबाद झाला.
९२ धावांचे सोपे लक्ष्य गाठताना, ट्रेंट रॉकेट्सच्या सलामीच्या जोडीने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला. सोफिया डंकलीने केट क्रॉसच्या गोलंदाजीवर डीप मिडविकेटवरून एक षटकार ठोकला आणि त्यानंतर जेस जोनासेनच्या गोलंदाजीवर स्लॉग स्वीप मारला. बेथ मुनीनेही कॅसिडी मॅकार्थीच्या गोलंदाजीवर सलग दोन चौकार मारून आपले खाते उघडले. त्यानंतर दोन्ही फलंदाजांनी क्रॉसच्या प्रत्येक षटकात चौकार मारून अवघ्या २५ चेंडूंमध्ये जवळपास निम्मे लक्ष्य गाठले.
एलिमिनेटर सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू हॅना बेकरसुद्धा रॉकेट्सच्या फलंदाजांना रोखू शकली नाही. मूनीने बॅकवर्ड पॉइंटच्या मागे चौकार मारून तिच्याविरुद्ध अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. काही चेंडूंनंतर, डंकलीनेही बेकरच्या गोलंदाजीवर कव्हरवरून चौकार मारला. अखेरीस डॅनियल गिब्सनने ही भागीदारी तोडली, पण तोपर्यंत रॉकेट्सने ६९ धावा केल्या होत्या. नॅट सायव्हर-ब्रंट लवकर बाद होऊनही, मूनी आणि ॲशले गार्डनरने ५४ चेंडूंमध्ये संघाला ९२/२ पर्यंत नेऊन एक ऐतिहासिक विजेतेपद मिळवून दिले.