
ISSF वर्ल्ड कपमध्ये उदयवीर सिद्धूची सुवर्ण कामगिरी; १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात पटकावले सुवर्णपदक
भारताचा नेमबाज उदयवीर सिद्धूने रविवारी आयएसएसएफ (ISSF) रायफल-पिस्तूल विश्वचषक स्पर्धेत पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक पटकावले. अंतिम फेरीत त्याने 240.6 गुणांची कमाई करत जर्मनीचा अनुभवी नेमबाज आणि अनेकदा ऑलिम्पिक पदक जिंकलेल्या ख्रिश्चन रिट्झ याचा 0.5 गुणांनी पराभव केला.
24 वर्षीय उदयवीरने अंतिम फेरीत दमदार कामगिरी केली. रिट्झने 240.1 गुणांसह रौप्यपदक मिळवले, तर इटलीच्या पाओलो मोन्नाने 219.8 गुणांसह कांस्यपदक पटकावले.
अंतिम फेरीतील अखेरच्या टप्प्यात उदयवीरने संयम राखत अचूक नेम साधले. शेवटच्या दोन शॉट्सपूर्वी तो रिट्झपेक्षा 0.3 गुणांनी मागे होता. मात्र, उदयवीरने या दोन शॉट्समध्ये अनुक्रमे 10.2 आणि 9.8 गुण मिळवले. दुसरीकडे, रिट्झला दोन्ही शॉट्समध्ये 9.6 गुण मिळाले. त्यामुळे उदयवीरने सुवर्णपदकावर नाव कोरले.
Kiara Advani: प्रेग्नंट कियारा आडवाणीचा बीच हॉलिडे; सिद्धार्थ आणि लेक सरायासोबत घालवतेय निवांत वेळ
अंतिम फेरीपूर्वी उदयवीरने पात्रता फेरीत सहा मालिकांमध्ये 99, 98, 98, 97, 97 आणि 96 असे एकूण 585 गुण मिळवले. या कामगिरीच्या जोरावर त्याने आठ नेमबाजांच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले.
भारताच्या जोनाथन गॅविन अँथनी याने पात्रता फेरीत 586 गुण मिळवत संयुक्तपणे अव्वल स्थान पटकावले. मात्र, तो केवळ रँकिंग पॉइंट्स (RPO) साठी सहभागी झाला होता. भारतीय नेमबाज अजेंद्र सिंह चौहान 580 गुणांसह 14व्या, तर ऑलिम्पिक पदकविजेता सरबजोत सिंह 574 गुणांसह 31व्या स्थानावर राहिला. आरपीओ गटात सहभागी झालेल्या कुमार योगेशने 573 गुण मिळवले.
तुर्कीचा पॅरिस 2024 ऑलिम्पिक पदकविजेता युसूफ डिकेच यालाही अंतिम फेरीत स्थान मिळाले होते. मात्र, 138.0 गुणांसह त्याला सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले. ग्रीसचा जॉर्जियोस गॅम्पिएराकिस 198.7 गुणांसह चौथा, तर लातव्हियाचा एमिल्स वासरमानिस 177.6 गुणांसह पाचव्या स्थानावर राहिला.
आयएसएसएफ रायफल-पिस्तूल विश्वचषक स्पर्धा 8 ते 16 ऑक्टोबर 2026 या कालावधीत काहिरा येथे होत आहे. भारताने या स्पर्धेसाठी 24 सदस्यीय संघ पाठवला आहे. स्पर्धेपूर्वी भारतीय नेमबाजांनी देहरादून येथील महाराणा प्रताप स्पोर्ट्स कॉलेजमध्ये 1 ते 7 ऑक्टोबरदरम्यान राष्ट्रीय सराव शिबिरात सहभाग घेतला. या शिबिरात सामन्यांचा सराव आणि तांत्रिक कौशल्य सुधारण्यावर भर देण्यात आला. भारत आठ वैयक्तिक ऑलिम्पिक प्रकारांसह दोन मिश्र सांघिक प्रकारांत सहभागी होत आहे.