UP T20 League मध्ये रिंकू सिंगची टीम जिंकली (फोटो सौजन्य - X.com)
मेरठ मॅव्हरिक्सचा कर्णधार रिंकू सिंगने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर स्वस्तिक चिकारा आणि दिव्यांश जोशी यांनी ५३ धावांची वेगवान सलामीची भागीदारी रचली. यानंतर, सलामीवीर दिव्यांश जोशीने धडाकेबाज कामगिरी करत लखनौच्या गोलंदाजांची धुलाई केली. त्याने अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमारसह संपूर्ण संघावर हल्ला चढवला आणि अवघ्या ४० चेंडूंमध्ये १२ चौकार आणि ७ षटकारांसह १०५ धावांचे झंझत शतक ठोकले. जोशीच्या शानदार शतकामुळे, मेरठ मॅव्हरिक्सने आपल्या २० षटकांत ७ गडी गमावून २०३ धावांची भक्कम धावसंख्या उभारली.
२०४ धावांच्या विशाल लक्ष्यासमोर लखनौ फाल्कन्सची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली आणि ते सुरुवातीपासूनच बॅकफूटवर होते. एमडी सैफ (१०), हिमांशू सिंग (५) आणि आराध्या यादव (५) यांसारखे प्रमुख फलंदाज लवकर बाद झाले. मधल्या फळीत, अजित वर्माने २४ चेंडूंमध्ये ३९ धावा (४ चौकार, २ षटकार) करून थोडा प्रतिकार दाखवला आणि कृतज्ञ कुमार सिंगने २१ धावांची भर घातली, परंतु संघाला सामन्यात परत आणण्यासाठी हे प्रयत्न अपुरे ठरले.
लखनौचा संपूर्ण संघ १६ षटकांत केवळ १०९ धावांवर सर्वबाद झाला, ज्यात कर्णधार भुवनेश्वर कुमार ५ धावांवर नाबाद राहिला. मेरठकडून विशाल चौधरीने भेदक गोलंदाजी करत चार षटकांत केवळ २४ धावा देऊन चार बळी घेतले. झीशान अन्सारीनेही केवळ १२ धावांत दोन बळी घेत उत्कृष्ट साथ दिली. करण चौधरी, विजय कुमार आणि यश गर्ग यांनी प्रत्येकी एक बळी घेतला
मेरठचा मुख्य फिरकी गोलंदाज, झीशान अन्सारीने दोन महत्त्वपूर्ण बळी घेत आपल्या शानदार हंगामाची सांगता केली. त्याने २५ बळींसह सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज म्हणून हंगाम पूर्ण केला आणि या सर्वोच्च कामगिरीबद्दल पर्पल कॅप पटकावली. विशाल चौधरी अंतिम सामन्यात मेरठचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला, त्याने चार षटकांत २४ धावा देऊन चार बळी घेतले. दिव्यांग जोशीला त्याच्या शानदार शतकासाठी सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.






