Asia Cup ट्रॉफी घेऊन पळून गेलेले Mohsin Naqvi कोण आहे? (Photo Credit- X)
Asia Cup 2025: आशिया कप २०२५ फायनलमध्ये भारतीय संघाने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला, पण त्यानंतर ट्रॉफी वितरण सोहळ्यात एक अभूतपूर्व घटना घडली. दुबईत झालेल्या या विजयानंतर भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि इतर खेळाडूंनी आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) अध्यक्ष मोहसिन नक्वी (Mohsin Naqvi) यांच्या हातून ट्रॉफी घेण्यास नकार दिला. यामुळे नक्वी ट्रॉफी घेऊनच निघून गेले आणि भारतीय संघाने ट्रॉफीशिवायच विजयाचा जल्लोष साजरा केला. या घटनेमुळे क्रिकेट जगतासह राजकीय वर्तुळातही मोठी खळबळ माजली आहे. बीसीसीआयने (BCCI) या घटनेचा निषेध करत, येत्या नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या आयसीसीच्या बैठकीत नक्वींच्या विरोधात तीव्र आक्षेप नोंदवणार असल्याचे सांगितले आहे.
मोहसिन नक्वी हे सध्या एसीसीचे अध्यक्ष, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) प्रमुख आणि पाकिस्तानचे गृहमंत्री आहेत. ते त्यांच्या कठोर भारतविरोधी भूमिकेसाठी ओळखले जातात. त्यांनी अनेक वेळा भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वादग्रस्त विधाने केली आहेत.
This man is Mohsin Naqvi, Pakistan’s Interior Minister, ACC & PCB Chairman. He ran away with the Asia Cup after Pakistan lost Now, wait for victory parades across Pakistan with that cup and Shahid Afridi claiming that Pakistan won Asia Cup 2025. Also, a new chapter will be… pic.twitter.com/Nsa58ngkA0 — Major Gaurav Arya (Retd) (@majorgauravarya) September 29, 2025
भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकव्याप्त काश्मीर (PoK) मध्ये दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले तेव्हाही नक्वी चर्चेत आले होते. या सर्जिकल स्ट्राइकमधून संतापलेल्या नक्वी यांनी भारतावर जोरदार टीका केली होती. एका पत्रकार परिषदेत त्यांनी ‘भारताने आपली जागा दाखवून दिली आहे’ असे म्हटले होते. त्यांच्या या विधानांवर भारतातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही टीका झाली होती. नक्वी यांच्यावर दहशतवादाविरुद्ध कारवाई करण्याऐवजी भारतविरोधी भडकाऊ विधाने करण्याचा आरोप आहे.
मोहसीन नक्वी हे पीपीपी नेते आसिफ अली झरदारी आणि पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्या जवळचे मानले जातात. झरदारी आणि आसिफ मुनीर हे आधीच त्यांच्या भारतविरोधी अजेंडासाठी ओळखले जातात. आशिया कप ट्रॉफी घेऊन गायब झालेले नक्वी हे पाकिस्तानमधील त्यांच्या मालकांना खूश करण्यासाठी असे करत असल्याचे मानले जाते.
सूत्रांनुसार, सामन्यानंतर भारतीय खेळाडूंना सांगण्यात आले की, पाकिस्तानचे गृहमंत्री आणि पीसीबी प्रमुख मोहसिन नक्वी त्यांना ट्रॉफी देणार आहेत. मात्र, सतत भारतविरोधी वक्तव्ये करणाऱ्या नक्वींकडून ट्रॉफी स्वीकारण्यास भारतीय संघाने स्पष्ट नकार दिला. त्यांनी ट्रॉफी इतर कोणत्याही अधिकाऱ्याकडून घेण्याची तयारी दर्शवली. या वादामुळे जवळपास एक तास ट्रॉफी वितरण सोहळा थांबला होता. अखेरीस, भारतीय संघाने ट्रॉफी न घेताच मैदानावर आनंद साजरा केला आणि नक्वी ट्रॉफी घेऊनच निघून गेले.
या घटनेनंतर बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी सांगितले की, “जे व्यक्ती आमच्या देशाविरुद्ध कट करत आहेत, त्यांच्याकडून भारत ट्रॉफी स्वीकारू शकत नाही. हा केवळ खेळाचा नाही, तर देशाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे.”
सैकिया पुढे म्हणाले, “आम्ही एसीसी अध्यक्षांकडून ट्रॉफी न घेण्याचा निर्णय घेतला. पण याचा अर्थ असा नाही की ते ट्रॉफी आणि पदके घेऊन जातील. हे दुर्दैवी आहे. आम्ही आशा करतो की ट्रॉफी आणि पदके लवकरच भारताला परत दिली जातील. नोव्हेंबरमध्ये दुबईमध्ये होणाऱ्या आयसीसी परिषदेत आम्ही या घटनेबद्दल कठोर निषेध नोंदवणार आहोत.”