सौजन्य- Wimbledon X account
स्पेनच्या कार्लोस अल्काराझने टेनिसचा मातब्बर खेळाडू नोव्हाक जोकोविचचा पराभव करून पुन्हा एकदा विम्बल्डन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. त्याने वयाच्या २१व्या वर्षी माजी जागतिक विम्बल्डन चॅम्पियन नोव्हाक जोकोविचचा ६-२, ६-२, ७-६ असा पराभव करून सलग दुसरे विम्बल्डन आणि चौथे ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावले. रविवारी, ऑल इंग्लंड क्लबच्या ग्रास कोर्टवर प्रेक्षकांना गेल्या वर्षीच्या अंतिम सामन्याची पुनरावृत्ती पाहायला मिळाली. ज्यामध्ये अल्काराझने जोकोविचचा पाच सेटमध्ये पराभव केला होता. यावर्षी तर सरळ तीन सेटमध्ये विजय मिळवत ग्रासकोर्टवरील आपले वर्चस्व सिध्द केले आहे.
सुरुवातीपासूनच सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचवर स्पेनचा अल्काराझ वरचढ दिसत होता. माजी चॅम्पियन नोवाकला पहिल्या सेटपासूनच टिकून राहण्याची संधी दिली नाही आणि पहिला सेट 6-2 असा जिंकला. दुसऱ्या सेटमध्येही अल्काराझने वर्चस्व ठेवत तो सेटही 6-2 असा जिंकला. तिसऱ्या सेटमध्ये नोव्हाकने झुंज दिली आणि तो टायब्रेकरपर्यंत नेण्यात यश मिळविले पण ते पुरेसे नव्हते. तो सेटही अखेर अल्काराझने 7-6 असा जिंकून विजेतेपदावर कब्जा केला आणि सलग दुसऱ्यांदा विम्बल्डन विजेतेपद जिंकण्याची किमया केली.
विम्बल्डन विजय आणि विक्रम
21 वर्षांखालील 4 ग्रँडस्लॅम जिंकणारा मॅट्स विलँडर, ब्योर्न बोर्ग आणि बोरिस बेकर यांच्यानंतर अल्काराज आता जगातील चौथा खेळाडू बनला आहे. सलग विम्बल्डन विजेतेपद पटकावणारा तो इतिहासातील पहिला स्पॅनिश खेळाडू ठरला आहे. या पराभवासह सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचचे ग्रास कोर्टवर सर्वाधिक ८ विजेतेपद जिंकण्याच्या रॉजर फेडररच्या विक्रमाशी बरोबरी करण्याचे स्वप्नही भंगले आहे.
अल्काराझने 2022 मध्ये यूएस ओपन स्पर्धा जिंकत पहिले स्लॅम विजेतेपद जिंकले. 22 वर्षांच्या होण्यापूर्वी इतर कोणत्याही खेळाडूने त्याच्यापेक्षा जास्त ग्रँडस्लॅम जेतेपदे जिंकलेली नाहीत. विम्बल्डनमधील पराभवामुळे सर्बियन टेनिसस्टार नोव्हाक जोकोविचचे आठवे विम्बल्डन आणि 25 वे ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावण्याचे स्वप्न यावेळी भंगले.