
WPL 2026 Final: 'You all deserve this victory...' King Kohli's special message on RCB's championship win goes viral.
Virat Kohli’s congratulations on RCB’s victory: ५ फेब्रुवारी रोजी महिला प्रीमियर लीग (डब्ल्यूपीएल) २०२६ च्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स आमनेसामने उभे ठाकले होते. या सामन्यात स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखालील आरसीबी संघाने दिल्ली कॅपिटल्स संघाचा ६ विकेट्सने पराभव करून विजेतेपदावर नाव कोरले. या विजयासह, आरसीबीने दुसऱ्यांदा डब्ल्यूपीएल ट्रॉफी आपल्या नावे केली. डब्ल्यूपीएल २०२६ चे जेतेपद पटकल्यानंतर आरसीबीवर क्रिकेट जगतातील अनेक प्रमुख व्यक्ती आणि चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
सोशल मीडियावर, चाहत्यांसह, अनेक माजी आणि सध्याच्या क्रिकेटपटूंकडून आरसीबी महिला संघाच्या ऐतिहासिक विजयाचे भरभरून कौतुक होताना दिसत आहे. दरम्यान, भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीने देखील आरसीबी महिला संघाचे या उल्लेखनीय कामगिरीबद्दल अभिनंदन केले आहे . तसेच संघाला या विजयासाठी पूर्णपणे पात्र असल्याचे देखील म्हटले आहे.
आरसीबीच्या विजयानंतर, विराट कोहलीने इंस्टाग्रामवर संघाच्या सेलिब्रेशनचा फोटो शेअर करत त्यावर लिहिले आहे. विराटने लिहिले की, “आम्ही पुन्हा एकदा चॅम्पियन झालो आहोत. खेळाडूंनी आरसीबीचा झेंडा उंच ठेवला आहे आणि ही एक अशी कामगिरी केली आहे ज्याचा तुम्हाला सर्वांना अभिमान वाटेल. या उल्लेखनीय विजयासाठी स्मृती मानधना, संपूर्ण संघ आणि व्यवस्थापनाचे हार्दिक अभिनंदन. तुम्ही सर्वजण या विजयाचे पात्र आहात. या क्षणाचा आनंद घ्या आणि आमच्या अद्भुत चाहत्यांचे प्रेम अनुभवा.”
असे पहिल्यांदाच झाले आहे की एकाच फ्रँचायझीने आयपीएल आणि डब्ल्यूपीएल दोन्ही जेतेपद पटकावले आहे. आरसीबी पुरुष संघ सध्याचा गत आयपीएल २०२५ चॅम्पियन राहिला आहे, तर महिला संघाने डब्ल्यूपीएल २०२६ चे जेतेपद आपल्या नावे केले. उल्लेखनीय म्हणजे, आरसीबीने गेल्या तीन वर्षांत सलग तीन प्रमुख ट्रॉफी जिंकल्या आहेत – २०२४ मध्ये डब्ल्यूपीएल, २०२५ मध्ये आयपीएल आणि आता २०२६ मध्ये पुन्हा डब्ल्यूपीएल ट्रॉफी जिंकली आहे.
महिला प्रीमियर लीग २०२६ चा अंतिम सामना आज रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात वडोदरा येथील कोटाम्बी स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामान्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सचा ६ विकेट्सने पराभव करून महिला प्रीमियर लीग २०२६ चे जेतेपद आपल्याकडे कायम राखले. संघाने प्रथम फलंदाजी करत जेमिमाह रॉड्रिग्सच्या अर्धशतकाच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने ४ गडी गमावून २०३ धावा केल्या. प्रतिउत्तरात आरसीबीने कर्णधार स्मृती मानधना आणि जॉर्जिया वॉल यांच्या अर्धशतकांच्या जोरावर हे लक्ष्य १९.४ षटकात ४ गडी गमावून पूर्ण केले आणि सलग दोन वेळा महिला प्रीमियर लीगचे विजेतेपद आपल्या नावे केले.