सायबर फसवणूक रोखण्यासाठी नव्या उपक्रमाची घोषणा (फोटो- सोशल मिडिया)
डिजिटल सिक्युरिटी नेटवर्क उपक्रमाची घोषणा
सायबर फसवणूक रोखण्यासाठी महत्वाचे पाऊल
कंपनीने जाहीर केली १०० कोटी रुपयांची गुंतवणूक
मुंबई: भारतातील वेगाने वाढणाऱ्या डिजिटल फायनान्स इकोसिस्टममध्ये सायबर फसवणूक रोखण्यासाठी आणि ग्राहकांचे संरक्षण मजबूत करण्यासाठी कॉईनडीसीएक्सने आज ‘डिजिटल सिक्युरिटी नेटवर्क (डी.एस.एन.)’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची घोषणा केली. या उपक्रमासाठी कंपनीने १०० कोटी रुपयांची (Cyber Attack) गुंतवणूक जाहीर केली आहे.
ही घोषणा अलीकडील एका घटनेच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली आहे, ज्यामध्ये कंपनीच्या सह-संस्थापकांना एका फसवणूक तक्रारीसंदर्भात ताब्यात घेण्यात आले होते. ही फसवणूक कॉईनडीसीएक्स.प्रो (coindcx.pro) या बनावट वेबसाईटद्वारे करण्यात आली होती, ज्याचा कॉईनडीसीएक्स (CoinDCX)च्या प्लॅटफॉर्मशी कोणताही संबंध नव्हता. ठाणे न्यायालयाने या प्रकरणात जामीन मंजूर करताना प्राथमिक तपासात कोणताही गुन्हा सिद्ध होत नसल्याचे स्पष्ट केले.
या अनुभवामुळे डिजिटल इकोसिस्टममधील एक मोठी पोकळी अधोरेखित झाली असल्याचे कॉईनडीसीएक्सचे सह-संस्थापक सुमित गुप्ता आणि नीरज खंडेलवाल यांनी नमूद केले. विश्वासार्ह व्यवसाय आणि त्यांचा गैरफायदा घेणाऱ्या घटकांमध्ये फरक ओळखण्यासाठी सक्षम यंत्रणा अद्याप उपलब्ध नाही. डिजिटल सिक्युरिटी नेटवर्क हा त्या दिशेने आमचे ठोस पाऊल असल्याचे त्यांनी सांगितले.
भारतामध्ये सायबर फसवणुकीचे प्रमाण झपाट्याने वाढत असून, ही परिस्थिती चिंताजनक बनली आहे. २०२५ मध्ये देशभरात सुमारे २८.१५ लाख सायबरक्राईम तक्रारी नोंदवण्यात आल्या, ज्यामध्ये वर्षानुवर्षे २४% वाढ दिसून आली. या फसवणुकांमुळे एकूण आर्थिक नुकसान २२,४९५ कोटी रुपये इतके झाले असून, त्यापैकी तब्बल ७६% नुकसान इन्व्हेस्टमेंट स्कॅम्समुळे झाले आहे. विशेष म्हणजे, नोंदवलेल्या तक्रारींपैकी केवळ २% पेक्षा कमी प्रकरणे एफआयआरमध्ये रूपांतरित झाली, ज्यामुळे अंमलबजावणी प्रक्रियेतील मर्यादा स्पष्ट होतात. याशिवाय, ४७% भारतीयांनी एआय-आधारित फसवणुकीचा—जसे की व्हॉइस क्लोनिंग आणि डीपफेक—प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष अनुभव घेतला आहे. दरम्यान, जानेवारी २०२६ मध्ये युपीआयद्वारे २१.७ अब्ज व्यवहार पार पडले, ज्यामुळे डिजिटल व्यवहारांचे प्रमाण प्रचंड वाढले असून संभाव्य सायबर हल्ल्यांचा धोका देखील अधिक वाढला आहे.
सायबर हल्ले ठरले भारतीय कंपन्यांसाठी सर्वात मोठा धोका; 51% CEO चिंतेत
डिजिटल सिक्युरिटी नेटवर्क हा बहुस्तरीय उपक्रम असून, तो फसवणूक होण्याआधीच रोखणे, ग्राहक जागरूकता वाढवणे आणि प्लॅटफॉर्म्स, नियामक आणि कायदा अंमलबजावणी संस्था यांच्यात समन्वय मजबूत करणे यावर लक्ष केंद्रित करतो.
डिजिटल सिक्युरिटी नेटवर्क अंतर्गत, कॉईनडीसीएक्स देशभरात व्यापक ग्राहक जागरूकता निर्माण करण्यावर भर देणार आहे. “ट्रान्झॅक्शनपूर्वी पडताळणी” या उपक्रमाद्वारे मल्टी-लँग्वेज शैक्षणिक सामग्री तयार केली जाईल आणि ती शाळा, महाविद्यालये तसेच फायनान्शियल लिटरेसी प्रोग्राम्समध्ये समाविष्ट केली जाईल. यासाठी ग्राहक संरक्षण संस्थांसोबतही भागीदारी करण्यात येईल. यासोबतच, सर्वांसाठी खुली असलेली २४×७ व्हॉट्सअप हेल्पलाइन सुरू केली जाईल, ज्याद्वारे वापरकर्ते कोणतीही संशयास्पद लिंक किंवा प्लॅटफॉर्म ट्रान्झॅक्शनपूर्वी त्वरित पडताळून पाहू शकतील.
याशिवाय, ओपन फ्रॉड इंटेलिजन्स एपीआय विकसित करून कायदा अंमलबजावणी संस्था, बँका, फिनटेक कंपन्या आणि दूरसंचार सेवा पुरवठादार यांच्यासोबत रिअल-टाइम डेटा शेअरिंग सक्षम केले जाईल. कॉईनडीसीएक्सने आतापर्यंत १,२०० पेक्षा अधिक बनावट वेबसाईट्स ओळखल्या असून, हा डेटा या एपीआयद्वारे शेअर केला जाणार आहे. यामुळे भारताच्या डिजिटल फायनान्स इकोसिस्टमसाठी एक ‘सामायिक संरक्षण यंत्रणा’ उभी राहील, जी फसवणुकीचे प्रयत्न लवकर ओळखून थांबवण्यास मदत करेल.
तसेच, कायदा अंमलबजावणी संस्थांसाठी सायबर इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत करण्यावरही भर दिला जाणार आहे. यामध्ये ब्लॉकचेन फॉरेन्सिक्स आणि डिजिटल अॅसेट ट्रेसिंगवरील प्रशिक्षण कार्यक्रम, सक्रिय फसवणूक प्रकरणांमध्ये मदत करणाऱ्या रॅपिड रिस्पॉन्स युनिटची स्थापना, तसेच सायबर क्राईम सेल्ससाठी तंत्रज्ञान अनुदान यांचा समावेश असेल.
यासोबतच, इंडस्ट्री स्तरावर सायबर सुरक्षा मानके विकसित करण्यासाठी आणि धोरणात्मक सहकार्य वाढवण्यासाठी कॉईनडीसीएक्स अंमलबजावणी संचालनालय, दिल्ली पोलीस, सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी, भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र (१४सी) आणि आयकर विभाग यांसारख्या संस्थांसोबत आपले सहकार्य अधिक मजबूत करणार आहे.






