किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषद घेत सत्ताधाऱ्यांवर साधला निशाणा (फोटो - सोशल मीडिया)
माध्यमांशी संवाद साधताना किशोरी पेडणेकर म्हणाल्या, मुंबई महानगरपालिकेत ७ मार्च २०२२ नंतर २०२६ मध्ये नगरसेवक निवडून आले आहेत. त्यानंतर सुधार समितीच्या कामकाजाला सुरुवात झाली आहे. समितीच्या बैठकीत मांडण्यात आलेल्या सुमारे ९ ते १० प्रस्तावांमध्ये त्रुटी असल्याचा दावा पेडणेकर यांनी केला. नगरसेवकांचे म्हणणे ऐकून घेतले जाणार नसेल, तर मुंबईला वाली कोण आहे, असा प्रश्न निर्माण होतो, असेही त्या म्हणाल्या.
आरे दुग्ध वसाहतीमध्ये रुग्णालयाची इमारत आणि शासकीय निवासस्थानांबाबतच्या प्रस्तावावर पेडणेकर यांनी आक्षेप घेतला. आरे कॉलनी परिसरात २७ आदिवासी पाडे असून, तेथील नागरिकांना रुग्णालयाची गरज असल्याचे त्यांनी मान्य केले. मात्र, प्रस्तावित रुग्णालयाची इमारत मुंबई महानगरपालिकेच्या मालकीची असावी, अशी मागणी त्यांनी केली.
सुधार समितीचे सदस्य सचिन पडवळ यांनी हा प्रस्ताव फेरविचारासाठी परत पाठवण्याची मागणी केली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. जून २०२६ मध्ये प्रस्ताव पाठवण्यात आला असून, अद्याप त्यावर फेरविचार झालेला नसल्याचेही त्यांनी सांगितले.
जीर्ण झालेल्या इमारतींची डागडुजी केली जात नाही. राज्य सरकारने इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करून ती महानगरपालिकेकडे हस्तांतरित करावी. तसेच भविष्यात राज्य सरकारला आवश्यकतेनुसार जागा परत मागण्याची अट असल्याने आधी इमारत महानगरपालिकेच्या मालकीची करावी, अशी मागणी पेडणेकर यांनी केली.
मुलुंड जिमखान्याच्या भूखंडाच्या अदलाबदलीवर प्रश्न
मुलुंड जिमखान्याच्या भूखंडाच्या अदलाबदलीच्या प्रस्तावावरही त्यांनी आक्षेप घेतला. महानगरपालिका देत असलेल्या जागेची किंमत सुमारे साडेतीन कोटी रुपये असल्याचे सांगितले जात असले, तरी जागेचे योग्य मूल्यांकन होणे आवश्यक आहे. मुंबईकरांना सकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत या जागेचा प्रवेश मिळावा, याचा स्पष्ट उल्लेख प्रस्तावात असावा. तसेच करार ३० टक्के भाडेतत्त्वावर आणण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली.
‘मफलर मॅन’वरून रोहित पवारांचा फडणवीसांवर निशाणा; सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितलं…
‘मौल्यवान भूखंड कवडीमोल दराने देण्याचा प्रयत्न’
जी दक्षिण विभागातील एस्पल प्रकल्पांतर्गत प्लांट देण्याच्या प्रस्तावावरही पेडणेकर यांनी प्रश्न उपस्थित केले. संबंधित प्लांट बंद पडणार असेल, तर त्याऐवजी दुसरा प्लांट उभारण्यात यावा. अत्यंत मौल्यवान भूखंड कवडीमोल दराने दिला जात असल्याचा त्यांचा आक्षेप आहे. ६० वर्षांसाठी दिलेली जमीन भविष्यात पुन्हा महानगरपालिकेच्या ताब्यात येईलच, याची खात्री नसल्याचे त्या म्हणाल्या. मुंबई महानगरपालिका आर्थिक अडचणीत असताना अशा प्रकारे भूखंड देणे योग्य नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
डायलिसिस केंद्राच्या प्रस्तावातील अटींवर प्रश्न
आर दक्षिण विभागात पीपीपी मॉडेलअंतर्गत डायलिसिस केंद्र चालवण्यासाठी देण्यात येणाऱ्या प्रस्तावावरही पेडणेकर यांनी आक्षेप घेतला. संबंधित प्रस्ताव पाच महिन्यांपूर्वी सादर करण्यात आला असून, निविदेत ६१ लाख रुपयांची मशीन खरेदी केली जात आहे आणि त्यासाठी दरमहा दीड लाख रुपये भाडे आकारले जात असल्याचा दावा त्यांनी केला.
ब्लड टेस्टचे पैसे कोणाकडून आकारले जाणार, याचा स्पष्ट उल्लेख प्रस्तावात नसल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईकरांच्या हिताचा विचार करून प्रस्तावातील त्रुटी दूर करणे आवश्यक असल्याचे त्या म्हणाल्या.
बीएमसीचे नर्सिंग कॉलेज खासगी कंपनीला देण्यास विरोध
मुंबई महानगरपालिकेचे नर्सिंग कॉलेज एका खासगी कंपनीला चालवण्यासाठी देण्याच्या प्रस्तावालाही पेडणेकर यांनी विरोध केला. २५ हजार चौरस फुटांच्या जागेसाठी पाच कोटी रुपयांची बोली लागल्याचे सांगण्यात येत असून, बीएमसीच्या चार वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये नर्सिंगचे शिक्षण दिले जाते, असे त्यांनी नमूद केले.
या ठिकाणी महानगरपालिकेने स्वतःचे नर्सिंग डिग्री कॉलेज सुरू करावे, अशी मागणी त्यांनी केली. प्रस्तावानुसार बीएमसीच्या विद्यार्थ्यांना केवळ २० टक्के जागा मिळणार असून, उर्वरित ८० टक्के जागा इतर विद्यार्थ्यांसाठी असतील, असा दावा करत हा प्रस्ताव मागे घेण्याची मागणी त्यांनी केली.
‘मुंबईची लूट सुरू – किशोरी पेडणेकर
भाजप आणि शिंदे गटाच्या सदस्यांकडून प्रस्ताव मंजूर करताना ‘अदृश्य शक्ती’चा हात असल्याचे चित्र दिसत असल्याचा आरोप पेडणेकर यांनी केला. सध्या मुंबईत कोण किती भूखंड घेत आहे, याचीच जणू चुरस सुरू असल्याची टीकाही त्यांनी केली.
पुढे त्या म्हणाल्या,” भाजप आणि शिवसेना एकत्र येऊनही मुंबईचे भले होत नसून, उलट मुंबईची लूट सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. सुधार समितीच्या कामकाजाबाबत सुमारे १५ दिवसांपूर्वी पत्र दिल्याचे सांगत, समितीच्या बैठकीत नियमांचे पालन होत नाही. सत्ताधारी पक्षाला पाठीशी घालण्याचे काम प्रशासनाकडून केले जात असून, विरोधकांच्या उपसूचना स्वीकारल्या जात नसल्याचा आरोपही पेडणेकर यांनी केला.”
Ans: सुधार समितीच्या बैठकीतील सुमारे ९ ते १० प्रस्तावांमध्ये त्रुटी असून, नगरसेवकांनी त्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही बहुमताच्या जोरावर प्रस्ताव मंजूर केले जात असल्याचा आरोप किशोरी पेडणेकर यांनी केला.
Ans: आरे कॉलनीतील नागरिकांना रुग्णालयाची गरज मान्य करतानाच, प्रस्तावित रुग्णालयाची इमारत मुंबई महानगरपालिकेच्या मालकीची असावी, अशी त्यांची मागणी आहे.
Ans: महानगरपालिकेचे नर्सिंग कॉलेज खासगी कंपनीला चालवण्यासाठी देण्याऐवजी बीएमसीने स्वतःचे नर्सिंग डिग्री कॉलेज सुरू करावे, अशी मागणी त्यांनी केली. प्रस्तावानुसार बीएमसीच्या विद्यार्थ्यांना केवळ २० टक्के जागा मिळणार असल्याचा त्यांचा आक्षेप आहे.






