Scam Alert: मोबाईलवर आला असा मेसेज? दुर्लक्ष केल्यास होईल मोठं नुकसान... सरकारने दिला इशारा
गृह मंत्रालयच्या सायबर सिक्योरिटी विंग I4C ने सायबर दोस्तच्या माध्यमातून लोकांना सावध केलं आहे. तुम्ही तुमच्या फोनवर येणाऱ्या एसएमएसकडे दुर्लक्ष करत असाल तर मोठी समस्या निर्माण होऊ शकते आणि परिणामी तुमचं मोठं नुकसान होऊ शकत. त्यामुळे तुमच्या फोनवर येणाऱ्या प्रत्येक मेसेज अलर्टवर लक्ष ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
CyberDostI4C ने त्यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवर सांगितलं आहे की, स्कॅमर्सना धडा शिकवण्यासाठी आणि नागरिकांची सुरक्षा वाढवण्यासाठी सरकारने एक नवीन प्रणाली लागू केली आहे. यामध्ये जर तुमच्या नंबरवर कॉल फॉरवर्डिंग अॅक्टिव्ह करण्यात आले, तर एसएमएसद्वारे तुम्हाला याबाबत तात्काळ सूचना दिल्या जातात. वेगाने वाढणाऱ्या सायबर फ्रॉडला थांबवण्यासाठी सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
That SMS about call forwarding is not just another notification. It could be an early warning that your number is being misused pic.twitter.com/dxWru2zNZ8 — CyberDost I4C (@Cyberdost) June 18, 2026
सायबर दोस्तने सांगितलं आहे की, जर तुमच्या मोबाईल नंबरवर कॉल फॉरवर्डिंग अॅक्टिव्ह करण्यात आले, तर ताबडतोब रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर याबाबत एसएमएस अलर्ट पाठवला जातो. जर तुम्ही कॉल फॉरवर्डिंग अॅक्टिव्ह करण्यासाठी कोणताही अर्ज केला नसेल तर तात्काळ हे फीचर डिसेबल करणं गरजेचं आहे.
कॉल फॉरवर्डिंग डिसेबल करण्यासाठी तुम्हाला तुमच्या फोनवर डायल पॅडमध्ये जाऊन ##002# डायल करावे लागेल. हा नंबर डायल करताच कॉल फॉरवर्डिंग तात्काळ बंद होणार आहे. तसेच, सरकारने लोकांना सूचना दिल्या आहेत की, व्हेरिफाय न करता तुमच्या मोबाईल नंबरवर कोणाच्याही सांगण्यावरून कॉल फॉरवर्डिंग कोड्स डायल करू नका. असं केल्यास तुमच्या मोबाईल नंबरवर येणारे इनकमिंग कॉल्स कोणत्याही दुसऱ्या नंबरवर फॉरवर्ड केले जातील.
सायबर गुन्हेगार तुमच्या नंबरवर कॉल करून ओटीपीची विनंती करू शकतात, जो नंतर कॉल फॉरवर्डिंगद्वारे त्यांच्या नंबरवर पाठवला जातो. ओटीपी मिळताच तुमचं बँक अकाऊंट रिकामं होऊ शकत. तसेच तुमच्या डिजिटल ओळखीसोबत देखील छेडछाड करू शकतात. अशा परिस्थितीत तुम्हाला नेहमी कॉल फॉरवर्डिंगवाल्या एसएमएस अलर्टवर लक्ष ठेवावे लागणार आहे. त्यामुळे तुम्ही कोणत्याही मेसेजकडे दुर्लक्ष करू नका आणि सावध राहा.






