फोटो सौजन्य - सोशल मिडीया
12 जुलै रोजी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट विवाहबंधनात अडकले. जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये मोठ्या थाटामाटात या दोघांचे लग्न पार पडले. या लग्न सोहळ्यात अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. या दोघांचा आशीर्वाद सोहळा देखील नुकताच पार पडला. आशीर्वाद सोहळा देखील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला देखील अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली होती. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाहानंतर एक मॅसेज सर्वत्र व्हायरल होत आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नाच्या निमित्ताने JIO यूजर्सना 3 महिन्यांचा फ्री रिचार्ज देण्यात येणार आहे, असा दावा या मॅसेजमध्ये करण्यात आला आहे.
व्हायरल होत असलेल्या मॅसेजमध्ये म्हटलं आहे की, ’12 जुलै रोजी झालेल्या अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाच्या निमित्ताने, मुकेश अंबानी भारतातील सर्व JIO यूजर्सना 3 महिन्यांचा 799 रुपयांचा रिचार्ज मोफत देत आहेत. त्यामुळे खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि तुमचा नंबर चार्ज करा.’ महा कॅशबॅक नावाच्या अज्ञात साइटची लिंक देखील या मॅसेजमध्ये देण्यात आली आहे. मात्र हा मॅसेज बनावट असून संबंधित लिंकवर क्लिक केल्यास तुमची फसवूणक होऊ शकते. याबाबत JIO ने देखील माहिती दिली आहे.
कंपनी युजर्सना कोणताही मोफत डेटा प्लॅन ऑफर करत नाही. त्यामुळे युजर्सनी अशा प्रकारच्या मॅसेजवर विश्वास ठेऊ नये. अशा मॅसेजमुळे युजर्स मोठ्या घोटाळ्यात अडकू शकतात. हा मॅसेज खोटा असून अशी कोणतीही ऑफर कंपनीने सुरु केली नाही, असं JIO ने सांगितलं आहे.
दिवसेंदिवस सर्वसामान्यांची फसवणूक होण्याच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. खोटे मॅसेज व्हायरल करून लोकांची फसवणूक केली जात आहे. काही दिवसांपूर्वीच तुमच्या घराचा वीज पुरवठा खंडीत होणार आहे, असा मॅसेज देशभरातील लोकांच्या फोनवर आला होता. त्यानंतर तुमचं गॅस कनेक्शन बंद होणार आहे, असा मॅसेज अनेकांच्या फोनवर आला. मॅसेजमध्ये म्हटलं होतं की, ‘प्रिय ग्राहक. तुमच्या गॅस कनेक्शनचं बिल अपडेट झालेलं नाही. त्यामुळे तुमचं कनेक्शन तोडून टाकण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवर फोन करा.’
तर दुसऱ्या मॅसेजमध्ये म्हटलं होतं की, ‘प्रिय ग्राहक, आज रात्री ९.३० वाजता तुमच्या घराची वीज कापली जाणार आहे. लवकरात लवकर आमच्या विभागीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधा.’ या मॅसेजमुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. लोकांची फवसणूक करण्यासाठी आणि त्यांच्यामध्ये दहशत पसरवण्यासाठी हा मेसेज पाठविण्यात आला असल्याचे समोर आले. हा मेसेज बनावट असून नागरिकांनी ह्या मेसेजवर विश्वास ठेऊ नये, असं आवाहन शासनाने केलं होतं. त्यानंतर आता अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नाच्या निमित्ताने JIO यूजर्सना 3 महिन्यांचा फ्री रिचार्ज देण्यात येणार असल्याचा मॅसेज व्हायरल होत आहे.