
वसई किल्ल्यावर मराठी न बोलणाऱ्या गार्डला युवकाने चांगलेच झापले (Photo Credit- X)
व्हायरल झालेल्या व्हिडिओनुसार, वसई किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत एका विशिष्ट दृश्याचे चित्रीकरण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या युवकाला सुरक्षा रक्षकांनी तातडीने रोखल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला. चित्रीकरण करण्यापासून मज्जाव झाल्यानंतर, या तरुणाने सुरक्षा रक्षकांना आणि अप्रत्यक्षपणे प्रशासनाला तीव्र शब्दांत जाब विचारत आपला संताप व्यक्त केला.
🚩वसई किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोशाखात फोटोशूट करत होते,
तेव्हा एक परप्रांतीय आला म्हणतो — “मराठी येत नाही, इथे शिवाजी महाराजांच्या पोशाखात फोटो काढायचे नाही!”
जसा कॅमेरा ऑन केला, तसा सगळे शांत झाले!
मराठी अस्मिता जागी ठेवा! 🚩🔥#VasaiFort #MarathiPride pic.twitter.com/egkeIIUWJd — Abhishek Deshmukh -अभिषेक देशमुख (@ADeshmukh41138) October 21, 2025
युवकाने सुरक्षा रक्षकांना मराठी येत नसल्याबद्दल जाब विचारला. “किल्ल्यासारख्या ऐतिहासिक आणि पवित्रस्थळी वारंवार अश्लील चाळे, प्री-वेडिंग शूट, डान्स चित्रीकरण आणि उच्छादमस्ती करणाऱ्या तरुणाईकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते.” “मात्र, जेव्हा महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशभूषेत चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केला जातो, तेव्हा त्याला तातडीने अडवलं जातं,” असे म्हणत या तरुणाने आपला तीव्र रोष व्यक्त केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत चित्रीकरण थांबवल्याने आणि दुसरीकडे किल्ल्यातील इतर गैरप्रकारांकडे दुर्लक्ष होत असल्याने युवकाचा हा भावनिक उद्रेक सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
गार्डचे नाव बृजेश कुमार गुप्ता असल्याचे समोर आले. युवकाने व्हिडीओमध्ये गार्डकडे बोट दाखवत म्हटले. “हा माणूस एक सिक्युरिटी गार्ड आहे, जो आम्हा मराठ्यांना फोटो काढण्यापासून थांबवत आहे? आम्ही त्याचे काय करायचे? आणि हा म्हणतो, मला मराठी येत नाही.” “आता लक्षात ठेव. तू फेमस होशील आणि तुला ही नोकरी सोडावी लागेल. तू इथे छत्रपतींचा सन्मान करत नाहीयेस, नाही का? वसई कुठे आहे? वसई किल्ल्यावर!”
वसई किल्ल्यावर घडलेल्या भाषिक वादाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत असलेला संबंधित युवक, हिंदीत बोलण्याचा आग्रह धरणार्या सुरक्षा रक्षकाला स्पष्ट शब्दांत झापताना दिसत आहे. वसई किल्ल्यासारख्या महाराष्ट्रातील ऐतिहासिक ठिकाणी मराठी भाषेचा आदर न ठेवल्यामुळे हा वाद चिघळला असून, हा व्हिडीओ सध्या जनमानसात जोरदार चर्चेचा विषय बनला आहे.