Asha Bhosle Death : सुरांची आशा हरपली...! आशा भोसले यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर शोककळा; नेटकऱ्यांनी वाहली श्रद्धांजली (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
भारतीय संगीत विश्वावर आज दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सुरांची राणी ओळखल्या जाणाऱ्या आशा भोसले यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने संपूर्ण देश गहिवरुन गेला आहे. आपल्या सुमधुर आवाजाने लोकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणाऱ्या गायिकेच्या निधनानंतर सोशल मीडियावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या चाहत्यांपासून ते कलाकार, राजकारण्यांपर्यंत प्रत्येकाने वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली वाहली आहे. संपूर्ण इंटरनेटवर केवळ आशा भोसलेंच्या आवाजाची, त्यांच्या गाण्यांची आणि हास्याची झलक पाहायला मिळत आहे.
सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी आशा भोसले यांच्या निधनाचे वर्णन एका युगाचा अंत असे केले आहे. कोणी म्हणतेय सुरांची आशा हरपली, तर कोणी संगीत विश्वातील जादूई आवाज हरपला म्हणत आहे. त्यांची अजरामर गाणी, मुलाखती आणि मंचावरील सादरीकरणाचे व्हिडिओ एक्स, इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर शेअर केले जात आहे. त्यांची सुपहिट गाणी पोस्ट करुन त्यांना श्रद्धांजली वाहली जात आहे. चाहत्यांनी अतिशय भावुक प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने म्हटले आहे की, अलविदा सुरांची राणी. तुम्ही आम्हाला कधीच सोडून जाणार नाही. तुमचा आवाज आमच्यासोबत सदैव राहील…
मनोरंजनविश्वातील माहिती लोकांपर्यंत पोहचवणाऱ्या राजश्री मराठी ने देखील आशा भोसले यांना सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत श्रद्धांजली वाहली आहे. इन्स्टाग्रावर एक व्हिडिओ पोस्ट करत लिहिले आहे की, “एका युगाचा अंत, आशा ताई तुम्ही कायम स्मरणात रहाल. भावपूर्ण श्रद्धांजली”
आशा भोसले यांना ११ एप्रिल रोजी हृदयविकाराचा झटका आल्याने मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना छातीत संसर्ग झाला होता. यामुळे चाहत्यांमध्ये घबराट उडाली होती. त्यांची प्रकृती सुधारण्यासाठी लोकांनी प्रार्थना सुरु केल्या होत्या. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आणि भारतीय संगीत विश्वात शोककळा पसरली.
आशा भोसले यांच्या आवाजाने केवळ भारतीयांना नाही, तर पाकिस्तानी नागरिकांनाही भुरळ घातली आहे. पाकिस्तानमधील एका नेटकऱ्याने देखील त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना केली आहे.
Asha Bhosle Passes Away : आशाताईंचे ‘ते’ गाणं ज्यावर घालण्यात आली होती बंदी, पण आज आहे क्लासिक Hit






