
Viral Video: काजू कतली खरेदी करणं पडलं महाग! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील ओपेरा हाऊस परिसरातील एका प्रसिद्ध मिठाई दुकानातून ग्राहकाने मोतीचूर लाडू आणि काजू कतली विकत घेतली होती. घरी सर्वजण मिठाईचा आस्वाद घेत असताना काजू कतलीच्या एका तुकड्यात धातूची गंजलेली पिनसारखी वस्तू दिसून आली. ही बाब लक्षात येताच कुटुंबातील सदस्य हादरले.
ग्राहकाच्या म्हणण्यानुसार, ही मिठाई त्यांच्या लहान मुलीला देण्यापूर्वीच ती धातूची वस्तू दिसली. त्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळल्याचे त्यांनी सांगितले. जर ही वस्तू लक्षात आली नसती, तर लहान मुलाच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला असता, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.
या घटनेनंतर संबंधित ग्राहकाने मिठाईच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. खाद्यपदार्थ तयार करताना स्वच्छता, गुणवत्ता तपासणी आणि सुरक्षिततेचे नियम कितपत पाळले जातात, याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. ग्राहकांचा विश्वास जपण्यासाठी अन्नपदार्थ तयार करणाऱ्या प्रत्येक ठिकाणी अधिक काटेकोरपणे काम होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
🚨 SHOCKING | A stapler pin was found inside a piece of Kaju Katli. The store’s hygiene conditions are equally disturbing. pic.twitter.com/l4v886pkq0 — FalconUpdatesHQ (@FalconUpdatesHQ) August 2, 2026
याच प्रकरणात आणखी एक धक्कादायक दावा समोर आला आहे. ग्राहकाने संबंधित दुकानाच्या स्वयंपाकघराचा व्हिडिओ चित्रीत केल्याचे सांगितले आहे. या व्हिडिओमध्ये स्वच्छतेची स्थिती अत्यंत खराब असल्याचा आरोप करण्यात आला आहे. अन्न तयार होणाऱ्या जागेची अवस्था पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
Spoiler दिला अन् थिएटरमध्ये झाला ‘क्लायमॅक्स’! चित्रपटगृहात तुफान हाणामारी; Video Viral
व्हिडिओतील दृश्यांनुसार, स्वयंपाकघरात अस्वच्छ वातावरण असल्याचे दिसून येते. त्याच जागेत शौचालय असल्याचा दावाही करण्यात आला आहे. तसेच गॅसवर ठेवलेल्या भांड्यात पायपुसणीसारखे दिसणारे कापड उकळत असल्याचेही व्हिडिओत दिसत असल्याचे सांगितले जात आहे. या दृश्यांमुळे सोशल मीडियावरही विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
घटनेची माहिती समोर आल्यानंतर अन्नसुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. ग्राहकांना विकल्या जाणाऱ्या पदार्थांची नियमित तपासणी व्हावी, उत्पादन प्रक्रियेवर देखरेख वाढवावी आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी अनेकांकडून केली जात आहे.
दरम्यान, या प्रकरणाची चौकशी संबंधित यंत्रणांकडून होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दोष आढळल्यास योग्य ती कारवाई व्हावी, अशीही मागणी होत आहे. मात्र ही माहिती समोर येईपर्यंत संबंधित मिठाई विक्रेत्याकडून कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण किंवा प्रतिक्रिया जाहीर करण्यात आलेली नव्हती.