Aisha Wahab: 'फॉस्टर केअर' ते अमेरिकी संसद! अफगाण-अमेरिकन नागरिक आयशा वहाब यांनी निवडणुकीत रचला नवा इतिहास ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
अमेरिकेच्या (America) राजकीय पटलावर एका सामान्य नागरिकाने आपल्या ध्येयनिष्ठेच्या आणि कष्टाच्या जोरावर इतिहास घडवला आहे. डेमोक्रॅटिक पक्षाच्या पुरोगामी नेत्या आयशा वहाब यांनी कॅलिफोर्नियाच्या १४ व्या काँग्रेस मतदारसंघातील विशेष निवडणुकीत दणदणीत विजय नोंदवला आहे. या विजयासह त्या अमेरिकी काँग्रेसमध्ये (संसदेत) प्रवेश करणाऱ्या पहिल्या अफगाण-अमेरिकन नागरिक आणि पहिल्या अफगाण-अमेरिकन महिला खासदार ठरल्या आहेत. त्यांचा हा विजय केवळ एका राजकीय पक्षाचा विजय नसून, प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यश संपादन करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी एक मोठा प्रेरणास्रोत ठरला आहे.
ही विशेष निवडणूक कॅलिफोर्नियाच्या १४ व्या काँग्रेस मतदारसंघात पार पडली. या निवडणुकीत आयशा वहाब यांचा सामना पक्षातीलच मध्यमार्गी उमेदवार मेलिसा हर्नांडेझ यांच्याशी होता. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या लढतीत आयशा वहाब यांनी तब्बल ५३.०९ टक्के मते मिळवून विजय मिळवला, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी मेलिसा हर्नांडेझ यांना ४६.९१ टक्के मतांवर समाधानी राहावे लागले. हा विजय मिळवणे आयशा यांच्यासाठी सोपे नव्हते, कारण अंतिम टप्प्यात अनेक बाह्य राजकीय गटांनी त्यांच्याविरोधात लाखो डॉलर्सचा प्रचार निधी खर्च केला होता. परंतु, मतदारांनी त्यांच्या पारदर्शक कामावर आणि संघर्षावर विश्वास दाखवत त्यांना कौल दिला.
आयशा वहाब यांचा इथंपर्यंतचा प्रवास कोणत्याही चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही. त्यांचा जन्म १९८७ मध्ये न्यूयॉर्क शहरात झाला. सोव्हिएत युद्धाच्या काळात त्यांचे आई-वडील अफगाणिस्तान सोडून निर्वासित म्हणून अमेरिकेत आले होते. मात्र, अमेरिकेत आल्यानंतर काही दिवसांतच त्यांच्या वडिलांची निर्घृण हत्या झाली आणि त्यानंतर काही काळातच त्यांच्या आईचेही अचानक निधन झाले. अत्यंत लहान वयातच आई-वडिलांचे छत्र हरपल्यामुळे आयशा आणि त्यांच्या मोठ्या बहिणीला अमेरिकेतील ‘फॉस्टर केअर सिस्टीम’मध्ये (पालकत्व प्रणाली) राहावे लागले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : India Argentina Army: उत्तराखंडमधील कामेट शिखरावर भारत अन् अर्जेंटिनाचे सैनिक फडकवणार ध्वज; 35 जवानांच्या मोहिमेला हिरवा झेंडा
अनाथ आश्रमासारख्या आणि अनोळखी कुटुंबांच्या आश्रयाला राहून आयशा यांनी आपले बालपण काढले. त्या जेव्हा सुमारे ९ वर्षांच्या होत्या, तेव्हा कॅलिफोर्नियातील फ्रेमोंट शहरात राहणाऱ्या एका सेवाभावी अफगाण-अमेरिकन दांपत्याने त्यांना दत्तक घेतले आणि त्यांना नवीन जीवन मिळाले. लहानपणापासूनच गरिबी, कौटुंबिक दुःख आणि सामाजिक अनिकेतता जवळून पाहिल्यामुळे आयशा यांच्या मनात उपेक्षित घटकांसाठी काम करण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली.
उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर आयशा यांनी सामाजिक कार्यात स्वतःला झोकून दिले. २०१८ मध्ये त्यांनी हेवर्ड शहराच्या ‘सिटी कौन्सिल’ची (नगरपरिषद) निवडणूक जिंकली. या विजयासह त्या अमेरिकेत कोणत्याही सार्वजनिक पदावर निवडून येणाऱ्या पहिल्या अफगाण-अमेरिकन महिला ठरल्या. त्यानंतर २०२२ मध्ये त्यांनी कॅलिफोर्निया स्टेट सेनेटची निवडणूक जिंकून इतिहास रचला आणि कॅलिफोर्निया सेनेटवर निवडून येणाऱ्या पहिल्या मुस्लिम व अफगाण-अमेरिकन महिला बनल्या.
सेनेटर म्हणून काम करताना त्यांनी कामगारांचे हक्क, परवडणारी घरे आणि जातीनिहाय भेदभावाविरुद्ध कायदे बनवण्यासाठी महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला. त्यांच्या या पुरोगामी विचारांमुळे आणि तळागाळातील लोकांशी असलेल्या जोडणीमुळे त्यांना जनतेचा प्रचंड पाठिंबा मिळाला, ज्यामुळे आज त्या थेट अमेरिकन संसदेच्या सभागृहात पोहोचल्या आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Exercise Maitree-XV: 9 व्या गोरखा रायफल्सचे शूर सैनिक थायलंडच्या भूमीत; पहा भारत-थायलंड संयुक्त युद्धसरावाचे ‘हे’ खास क्षण
डेमोक्रॅटिक पक्षाचे माजी खासदार एरिक स्वॉलवेल यांच्यावर लैंगिक गैरवर्तनाचे गंभीर आरोप झाल्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या या जागेसाठी ही विशेष निवडणूक घेण्यात आली. या विजयानंतर आयशा वहाब २० जानेवारीपर्यंत एरिक स्वॉलवेल यांच्या उर्वरित कार्यकाळासाठी काँग्रेस सदस्य म्हणून काम पाहतील.
येत्या नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत पूर्ण दोन वर्षांच्या कार्यकाळासाठी आयशा वहाब यांचा सामना पुन्हा एकदा मेलिसा हर्नांडेझ यांच्याशी होणार आहे. आपल्या ऐतिहासिक विजयानंतर बोलताना आयशा यांनी भावूक होत सांगितले, “अनाथ आश्रमातून (फॉस्टर केअर) सुरू झालेला हा प्रवास थेट अमेरिकन काँग्रेसपर्यंत पोहोचू शकतो, हाच खऱ्या ‘अमेरिकन ड्रीम’चा जिवंत पुरावा आहे. मी माझ्या मतदारसंघातील सर्व नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी तत्पर राहीन.“






