Pakistan airstrikes : पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यात ४ निष्पाप अफगाण नागरिक ठार, तालिबानने केला 'असा' मोठा दावा ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
दक्षिण आशियातील राजकीय आणि लष्करी परिस्थिती दिवसेंदिवस अधिक स्फोटक बनत चालली आहे. पाकिस्तानच्या (Pakistan airstrikes) लढाऊ विमानांनी अफगाणिस्तानच्या प्रादेशिक सार्वभौमत्वाचे उल्लंघन करत कंदाहार, खोस्त आणि पक्तिया या तीन प्रमुख प्रांतांमधील विविध ठिकाणांवर अचानक भीषण हवाई हल्ले केले. या लष्करी कारवाईमुळे दोन्ही शेजारी देशांमधील तणाव पराकोटीला पोहोचला असून सीमेवर युद्धाची भीषण छाया पसरली आहे.
तालिबान सरकारच्या अधिकृत प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, या पाकिस्तानी हवाई हल्ल्यांमध्ये चार निष्पाप अफगाण नागरिकांचा जागीच मृत्यू झाला आहे. तालिबान प्रशासनाने या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला असून, हा हल्ला अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वावर आणि अखंडतेवर झालेला थेट हल्ला असल्याचे म्हटले आहे. या आक्रमकतेला आणि दडपशाहीला योग्य वेळी निर्णायक आणि सडेतोड प्रत्युत्तर दिले जाईल, असा स्पष्ट इशारा तालिबानने पाकिस्तानला दिला आहे.
पाकिस्तान लष्कराने या हवाई हल्ल्यांचे समर्थन करताना असा दावा केला होता की, अफगाणिस्तानच्या हद्दीतून पाकिस्तानात कथित ड्रोन पाठवले जात होते. स्वतःच्या देशाची सुरक्षा आणि प्रादेशिक अखंडता टिकवण्यासाठी ही लष्करी कारवाई करणे अत्यंत गरजेचे होते, असे स्पष्टीकरण इस्लामाबाद प्रशासनाने दिले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : PTI Protest : इस्लामाबादमध्ये होणार अंतर्गत महायुद्ध! आसिम मुनीर यांनी उभ्या केल्या कंटेनरच्या भिंती; इम्रान समर्थक बुलडोझरसह सज्ज
तथापि, तालिबानचे प्रवक्ते झबिहुल्ला मुजाहिद यांनी पाकिस्तानचे सर्व दावे ठामपणे फेटाळून लावले आहेत. पाकिस्तान स्वतःच्या अंतर्गत सुरक्षा अपयशावरून लक्ष हटवण्यासाठी आणि लष्करी कारवायांचे समर्थन करण्यासाठी असे खोटे आणि बनावट दावे करत असल्याचा गंभीर आरोप मुजाहिद यांनी केला. अफगाणिस्तान आपल्या नागरिकांच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड करणार नाही आणि अशा प्रक्षोभक कारवायांमुळे दोन्ही देशांतील संबंध अधिक बिघडतील, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
पाकिस्तानच्या या आक्रमक भूमिकेवर अफगाणिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष हमीद करझई यांनीही अत्यंत कडक शब्दांत टीका केली आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपली प्रतिक्रिया नोंदवताना म्हटले की, कंदाहार, खोस्त आणि पक्तिया येथील बॉम्बस्फोट हे शेजारील देशांच्या परस्पर आदराच्या आणि आंतरराष्ट्रीय नियमांच्या पूर्णपणे विरोधात आहेत.
कराची आणि इस्लामाबादने आपल्या नकारात्मक धोरणाचा पुनर्वचार करण्याची वेळ आली आहे, असे सांगत करझई यांनी पाकिस्तानला लष्करी बळाचा वापर करण्याऐवजी शांततापूर्ण चर्चा आणि राजनैतिक मार्गाने प्रश्न सोडवण्याचा सल्ला दिला. हिंसाचाराच्या या आगीची झळ स्वतः पाकिस्तानलाही बसू शकते, असा इशाराही त्यांनी दिला.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Sam Altman: ‘मिसाइल बनवणे ते युद्धाचे निर्णय घेणे, AI घेणार जगाचा ताबा’; UN बैठकीत एआय कंपन्यांच्या प्रमुखांचा जगाला गंभीर इशारा
पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर हवाई हल्ले करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही कुनार आणि पक्तिका प्रांतांमध्ये पाकिस्तानी विमानांनी अशाच प्रकारे बॉम्बफेक केली होती. ड्युरंड रेषेवरील सीमा विवाद, दहशतवादी संघटनांचे आश्रयस्थान आणि परस्परांवर केले जाणारे आरोप यांमुळे दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंध कमालीचे ताणले गेले आहेत.
हवाई हल्ल्यांच्या या ताज्या सत्रामुळे केवळ सीमावर्ती भागातच नव्हे तर संपूर्ण दक्षिण आशियाई क्षेत्रात सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. आगामी दिवसांत तालिबान या हल्ल्याचा बदला कसा घेणार आणि दोन्ही देशांमधील राजनैतिक चर्चा पुन्हा सुरू होणार की संघर्ष अधिक तीव्र होणार, याकडे जगभरातील आंतरराष्ट्रीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे.






