'फक्त 'या' दोन गोष्टी केल्या तर…' इराण अणुशक्ती बनण्यापासून दोन पावलं दूर, पेंटागॉनचा खळबळजनक अहवाल समोर ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Pentagon Iran nuclear capability : अमेरिकेच्या बंकर बस्टर हल्ल्यानंतर इराणचा अणुकार्यक्रम उद्ध्वस्त झाल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जाहीर करत असतानाच, पेंटागॉनच्या गुप्तचर अहवालाने संपूर्ण आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ माजवली आहे. या अहवालात स्पष्ट सांगितले आहे की, इराणच्या अणुस्थळांचे फारसे नुकसान झालेले नाही आणि केवळ २ लहान तांत्रिक गोष्टी पूर्ण केल्या तर इराण लगेच अण्वस्त्र तयार करू शकतो. अहवालानुसार, इराणला फक्त अणुसाइट्सची साफसफाई आणि आवश्यक दुरुस्तीचे काम पूर्ण करावे लागेल, आणि त्यानंतर तो पुन्हा त्याचा अण्विक कार्यक्रम पूर्ण क्षमतेने सुरु करू शकेल.
एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, पेंटागॉनच्या एका वरिष्ठ गुप्तचर अधिकाऱ्याने सांगितले की, अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही इराणचे बहुतांश सेंट्रीफ्यूज सुरक्षित आहेत. त्यामुळे इराणला पुन्हा अण्वस्त्र निर्माणाच्या दिशेने वाटचाल करणे फार कठीण राहणार नाही. या अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, इराण किती लवकर अण्वस्त्र बनवेल हे त्या सुविधांची साफसफाई आणि पुनर्बांधणी किती लवकर होते यावर अवलंबून आहे. यासंदर्भात अल-अरेबिया वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, इराण दोन महिन्यांत पुन्हा आपला अण्वस्त्र कार्यक्रम पूर्ण क्षमतेने सुरू करू शकतो.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Iran–Israel war : ‘स्मशान शांतता अन् ताजे व्रण…’ इस्रायलमध्ये ३० हजारांहून अधिक घरे उद्ध्वस्त, पाहा Recent Update
इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी या पार्श्वभूमीवर स्पष्टपणे सांगितले की, आमचा अण्वस्त्र कार्यक्रम थांबलेला नाही आणि त्यावर कोणतीही चर्चा होणार नाही. त्यांनी असेही सांगितले की, “आम्ही कायद्याच्या चौकटीत राहून युरेनियम समृद्ध करत आहोत. इराण एक शांतताप्रिय देश आहे आणि आम्ही कोणाच्याही दबावासमोर झुकणार नाही.” अराघची यांच्या या विधानानंतर आंतरराष्ट्रीय समुदायामध्ये चिंता अधिक वाढली आहे. विशेषतः इस्रायल आणि अमेरिका यांच्याकडून इराणच्या अणुक्षमता वाढण्याकडे कायम लक्ष ठेवले जात आहे.
आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था (IAEA) च्या अहवालानुसार, इराणकडे सध्या ४०० किलोपेक्षा अधिक समृद्ध युरेनियम साठवलेले आहे. हे युरेनियम सेंट्रीफ्यूज तंत्रज्ञानाच्या साहाय्याने समृद्ध करण्यात आले आहे, आणि ते अण्वस्त्र निर्मितीसाठी उपयुक्त ठरू शकते. अहवालात असेही नमूद करण्यात आले आहे की, अमेरिकेच्या हल्ल्यापूर्वी इराणने काही प्रमाणातील युरेनियम सुरक्षित स्थळी हलवले होते, त्यामुळे संभाव्य हानीपासून तो यशस्वीरीत्या वाचला आहे.
दरम्यान, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी वक्तव्य करत दावा केला की, इराणला आता अण्वस्त्र बनविणे अशक्य आहे, पण पेंटागॉनच्या गुप्तचर अहवालामुळे त्यांच्या दाव्यावरही प्रश्न उपस्थित झाले आहेत. ही परिस्थिती वॉशिंग्टनपासून तेहरान आणि तेल-अवीवपर्यंत तणाव वाढवणारी आहे. इराण जर प्रत्यक्षात पुन्हा अण्वस्त्र कार्यक्रम सुरू करतो, तर त्याचे परिणाम संपूर्ण मध्यपूर्व क्षेत्रावर आणि जागतिक स्थैर्यावर होतील, असा इशारा तज्ञ देत आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : हिंद महासागरात रचला जातोय मृत्यूचा सापळा? भारतासाठी सावधानतेचा इशारा, ‘या’ तीन देशांचे मिळून मोठे षडयंत्र
पेंटागॉनच्या या अहवालामुळे इराणच्या अण्वस्त्र क्षमतेबाबत नवी चर्चा सुरु झाली आहे. जागतिक स्तरावर चिंता वाढली आहे की, इराण अण्वस्त्रनिर्मितीच्या दारात उभा आहे आणि फक्त दोन तांत्रिक गोष्टी केल्या की, तो आण्विक शक्ती म्हणून पुन्हा उभा राहील. यामुळे आगामी काळात अमेरिकेचा दबाव वाढू शकतो आणि पश्चिम आशियात आणखी संघर्षाची शक्यता निर्माण झाली आहे.