Bangladesh Hindus warn Give Parliament quota or face election boycott
Bangladesh Hindus quota demand : बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याक समुदायाने देशातील आगामी निवडणुकांपूर्वी सरकारपुढे ठाम भूमिका घेत स्पष्ट इशारा दिला आहे की, जोपर्यंत त्यांना संसदेत राखीव जागा आणि स्वतंत्र निवडणूक प्रणाली दिली जात नाही, तोपर्यंत ते कोणत्याही निवडणुकीत भाग घेणार नाहीत. हा अल्टिमेटम शुक्रवारी ढाका प्रेस क्लबबाहेर झालेल्या मानवी साखळी आणि निदर्शनादरम्यान देण्यात आला.
बांगलादेश राष्ट्रीय हिंदू महासभेचे अध्यक्ष दिनबंधू रॉय, कार्यकारी अध्यक्ष प्रदीप कुमार पाल, सरचिटणीस गोविंद चंद्र प्रामाणिक यांच्यासह इतर अनेक हिंदू नेत्यांनी निदर्शनात भाग घेतला. त्यांनी सरकारवर तीव्र शब्दांत टीका करत म्हटले की, “दर निवडणूक ही आमच्यासाठी एखाद्या शिक्षेसारखीच असते.” संसदेत हिंदू समाजाचे प्रतिनिधित्व नसल्याने, वर्षानुवर्षे त्यांना अन्याय, अत्याचार आणि दुजाभाव सहन करावा लागत आहे.
राखीव जागा आणि स्वतंत्र निवडणूक व्यवस्था ही फक्त मागणी नाही, तर आमच्या अस्तित्वाची गरज आहे, असे ते म्हणाले. जर सरकारने ही मागणी मान्य केली नाही, तर हिंदू समाज मतदान केंद्रांवर बहिष्कार टाकेल आणि लोकशाही प्रक्रियेतून स्वतःला पूर्णपणे वेगळे करेल, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
निदर्शनादरम्यान लालमोनिरहाट येथील परेश चंद्र शील आणि विष्णुपाद शील यांना तथाकथित धर्मद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली, त्याचा देखील निषेध करण्यात आला. नेत्यांनी या अटकेला खोटा खटला म्हणत ती हिंदूंवरील दडपशाहीचे एक उदाहरण ठरवत आहे, असे म्हटले. मंदिरांची तोडफोड, मूर्तींचे विघटन, हिंदू घरांवर हल्ले, महिलांवर अत्याचार, जमीन बळकावणे आणि जबरदस्तीने धर्मांतर घडवून आणणे – या सर्व घटनांचा सखोल आढावा देत सरकारच्या मौनवृत्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : स्वातंत्र्यदिनाच्या जल्लोषात अमेरिकेचा शक्तिप्रदर्शन करून इराणला इशारा; व्हाईट हाऊसवरून B-2 Stealth Bombers गरजले
हिंदू महासभेच्या नेत्यांनी दावा केला की, आजवर ‘शत्रू मालमत्ता कायद्या’च्या नावाखाली सुमारे २६ लाख एकर जमीन हिंदू समाजाकडून हिसकावून घेतली गेली आहे. ढाक्यातील मंदिरे आणि धार्मिक मालमत्ता देखील बेकायदेशीरपणे ताब्यात घेण्यात आल्या आहेत. ते पुढे म्हणाले की, बांगलादेशच्या स्वातंत्र्यानंतर सर्व धर्मांना समान अधिकार मिळतील, अशी आशा होती, परंतु वास्तव याच्या पूर्णपणे विरुद्ध आहे. आजही प्रशासकीय, राजकीय आणि घटनात्मक पातळीवर हिंदू समाजाचे अस्तित्व नाममात्रच आहे.
हिंदू नेत्यांनी या प्रसंगी म्हटले की, “आमची जमीन, आमची मंदिरे, आमचा आवाज – सर्व काही हिरावून घेतले गेले आहे. आता शांत राहून अन्याय सहन करण्याचे दिवस संपले.” बांगलादेशात सुमारे ८ ते १० टक्के हिंदू लोकसंख्या असूनही, त्यांना राजकीय प्रतिनिधित्व, धार्मिक स्वातंत्र्य आणि कायदेशीर संरक्षण मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘दलाई लामांचा नाही तर माओचा पुनर्जन्म शोधा’; तिबेटी निर्वासित सरकारचा चीनवर जोरदार हल्लाबोल
बांगलादेशातील हिंदू समाजाने दिलेला हा इशारा फक्त निवडणुकीच्या बहिष्कारापुरता मर्यादित नसून, तो त्यांच्या अस्तित्वाच्या लढ्याचा भाग आहे. सरकारने जर त्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही, तर देशातील लोकशाही प्रक्रियेवर आणि अल्पसंख्याकांच्या सुरक्षेवर गहिरे प्रश्न उपस्थित होतील. यामुळे बांगलादेश सरकारसमोर हिंदू समुदायाचे प्रश्न तातडीने सोडवण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.