Photo Credit : Team Navrashtra
ढाका : बांगलादेशमधील हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यात अपयश आल्याने शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा देत देशही सोडला. लष्कराच्या हॅलिकॉप्टरमधून त्या भारताकडे रवानाही झाल्या. मोठ्या प्रमाणात जाळपोळ आणि हिंसाचारामुळे बांगलादेशमध्ये परिस्थिती अत्यंत बिकट झाली. लोक रस्त्यावर उतरले असून हिंसाचार सुरू आहेत. सरकारी मालमत्ता जाळल्या जात आहेत. त्यांच्या राजीनाम्यानंतर लष्करप्रमुखांनी अंतरिम सरकार स्थापन करण्याची घोषणा केली आहे. पण शेख हसीना यांच्या राजीनाम्याची कारणेही तशीच आहेत.
सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणाबाबत बांगलादेशमध्ये विद्यार्थ्यांनी निदर्शने केली होती. पण काही दिवसातच या आंदोलनाला हिंसक वळण लागले. स्वातंत्र्यसैनिकांच्या वंशजांना दिल्या जाणाऱ्या ३० टक्के आरक्षणाचा वाद आहे. गुणवत्तेच्या आधारे सरकारी नोकऱ्या दिल्या जात नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला जात होता. तर सरकार आपल्या समर्थकांना आरक्षण देण्याच्या बाजूने आहे.
आरक्षणाबाबत बांगलादेशात सुरू झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात विरोधी पक्षही आघाडीवर आले. शेख हसीना सरकारच्या विरोधात विरोधकांनी मोठ्या प्रमाणावर निदर्शने केली. विरोधी पक्ष बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीने खालिदा झिया यांच्या नेतृत्वाखाली लाखोंचा जनसमुदाय जमवला आणि शेख हसीना यांच्या सत्तेलाच आव्हान दिले. विरोधकांनी हसिना यांच्या राजीनाम्याची मागणी केली. पण सरकारलाही विरोधकांचा सामना करण्यातही अपयश आले.
बांगलादेशात सुरू असलेल्या निदर्शनांमध्ये लष्करानेही सरकारला पाठिंबा देण्यास नकार दिला. हिंसक आंदोलनात 90 जणांना आपला जीव गमवावा लागला. यानंतर बांगलादेश लष्कराने सांगितले की, आता ते आंदोलकांवर गोळीबार करणार नाहीत. बांगलादेशच्या लष्करप्रमुखांनी लष्कराच्या मुख्यालयात परिस्थितीवर चर्चा केली आणि घोषणा केली की आता आंदोलकांवर एकही गोळी चालवली जाणार नाही. या वक्तव्यानंतर लष्कराला आंदोलकांबाबत सॉफ्ट कॉर्नर असल्याचे दिसून आले.
बांगलादेशात हिंसाचार भडकावण्यात पाकिस्तानचाही हात असल्याचा आरोप केला जात आहे. बांगलादेशच्या नागरी समाजाने पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयावर कट्टरपंथी विद्यार्थी आंदोलकाना पाठिंबा दिल्याचा आरोप केला आहे. विद्यार्थ्यांना पाठिंबा देऊन पाकिस्तान बांगलादेशच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करत आहे. बांगलादेशमध्ये बंदी असलेल्या ‘मिशन पाकिस्तान’ जमातीशी संबंधित विद्यार्थी आंदोलकांच्या एका भागाशी पाकिस्तान संपर्कात असल्याचे काही अहवालातून समोर आले आहे.
बांगलादेशची आर्थिक स्थिती आधीच वाईट होती, पण या आंदोलनामुळे त्यात अधिकच भर पडली. तेथे बेरोजगारी झपाट्याने वाढत आहे. बांगलादेशमध्ये शेख हसीना दीर्घकाळ सत्तेवर आहेत. अलीकडेच त्या पुन्हा बांगलादेशच्या पंतप्रधान झाल्या होत्या, तेव्हापासून बेरोजगार विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्याबाबत नाराजी आणि संतापाची भावनाही वाढील लागली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले.