Bangladesh Violence Mujibur Rahman's Dhaka House set on fire By Mob In Bangladesh
ढाका: बांगलादेशात पुन्हा हिसांचार उफाळून आला आहे. माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या समर्थकांच्या निदर्शनापूर्वी विरोधकांनी बुधवारी रात्री हिंसाचार घडला आहे. विरोधकांनी बांगलादेशचे संस्थापक आणि शेख हसीना यांचे वडील शेख मुजीबुर्रहमान उर्फ ‘बंगबंधू’ यांच्या ढाका येथील धनमंडी-32 घरावर हल्ला करत तोडफोड केली आणि आग लावली आहे. दुसरीकडे शेख हसीना यांच्या नातेवाईकांच्या घरावर देखील हल्ले करण्यात आले आहेत. सोशल मीडियावर यासंबंधित फोटो आणि व्हिडिओ देखील व्हायरल होत आहेत.
बुलडोझर हल्ले
खुलना येथे शेख हसीना यांचे चुलत भाऊ शेख सोहेल आणि शेख जेवेल यांच्या घरांवरही हल्ला करून घरांवर बुलडोझर चालवण्यात आले. हिंसक आंदोलनाला सोशल मीडियावरील ‘बुलडोझर जुलूस’च्या घोषणेने वेग आला. सुरक्षा दल घटनास्थळी उपस्थित असले तरी आंदोलकांना रोखण्याच्या त्यांच्या सर्व प्रयत्नांना अपयश आले.
The last trace of the architect of independent Bangladesh has been burned to ashes today.
Cry, Bangladesh, cry. pic.twitter.com/lj17JJ4IzJ— taslima nasreen (@taslimanasreen) February 5, 2025
हिंसा का भडकली?
शेख हसीना यांच्या आवामी लीगच्या कार्यकर्त्यांनी 6 फेब्रुवारी रोजी रस्त्यावर उतरून विरोध प्रदर्शन करण्याचे आवाहन केले होते. माजी पंतप्रधान शेख हसीनांवर दाखल केलेले खटले आणि अल्पसंख्याकांवरील हल्ल्यांच्या निषेधार्थ हे आंदोलन काढण्यात येणार होते. शेख हसीना यांच्या 5 ऑगस्ट 2024 रोडी देश सोडून जाण्याला सहा महिने पूर्णहोत आहे. काल रात्री हसीना त्यांच्या समर्थकांना ऑनलाइन भाषण देणार होत्या. याच्या निषेधार्थ ’24 रिवोल्यूशनरी स्टूडेंट-जनता’ या विद्यार्थी संघटनेने ‘बुलडोझर मार्च’ काढण्याचे जाहीर केले. मात्र, त्यापूर्वीच विरोधी आंदोलकांनी बंगबंधूंच्या घरावर हल्ले केले.
शेख हसीनाला फाशी द्या
विरोधी आंदोलकांनी बंगबंधूंच्या घराचे गेट तोडून आत प्रवेश केला. यादरम्यान ‘शेख हसीनाला फाशी द्या’, ‘मुजीबुर्रहमानच्या थडग्याची तोडफोड करा’, ‘अवामी लीगच्या समर्थकांना मारहाण करा’, असे नारे देण्यात आले.
आरक्षणविरोधी आंदोलनातून सत्ता उलथवली
5 जून 2024 रोजी बांगलादेशच्या उच्च न्यायालयाने सरकारी नोकऱ्यांमध्ये 30% आरक्षण लागू केले. या निर्णयाच्या विरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले. सरकारने हे आरक्षण रद्द करताच विद्यार्थ्यांनी हसीनांच्या राजीनाम्याची मागणी केली. 5 ऑगस्ट 2024 रोजी हसीनांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आणि भारतात आश्रय घेतला. यानंतर भारत आणि बांगलादेशमधील संबंध बिघडण्यास सुरुवात झाली. काल झालेल्या हिंसक आंदोलनात भारतविरोधी घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे. दरम्यान, मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील बांगलादेशच्या अंतरिम सरकारने हसीनाच्या प्रत्यार्पणाची मागणी केली आहे, परंतु भारताने त्याला प्रतिसाद दिलेला नाही.