उद्ध्वस्त गाझावर डोनाल्ड ट्रम्प यांना का हवे नियंत्रण? काय आहे अमेरिकेचा नवा 'प्लॅन'? (फोटो सौजन्य: नवराष्ट्र टीम)
वॉशिंग्टन: राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलॅंड, पनामा, आणि कॅनडा नंतर आता गाझावर नियंत्रण मिळवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांच्या या प्रस्तावाने जागतिक स्तरावर खळबळ उडाली असून अरब देशांनी याला तीव्र विरोध केला आहे. ट्रम्प यांनी इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेतला. त्यांनी गाझा मधील विस्थापित फिलिस्तिनी नागरिकांना जॉर्डन आणि इजिप्तमध्ये पुनर्वसन करावे आणि गाझाच्या पुनर्निर्माणाची जबाबदारी अमेरिका घ्यावी असे म्हटले.
डोनाल्ड ट्रम्प यांनी उघडपणे आपला हेतू जगासमोर मांडून सर्वांना धक्का दिला आहे. आधी ग्रीनलॅंड, मग पनामा आणि कॅनडाला अमेरिकेचा भाग बनवण्याची त्यांची इच्छा, आणि आता गाझावर देखील सत्ता ट्रम्प यांनी हवी आहे. आता प्रश्न निर्माण होतो की, उधवस्त झालेल्या गाझावर डोनाल्ड ट्रम्प यांना नियंत्रणका मिळवायचे आहे? या वादग्रस्त विधानामागे नेमकी काय रणनिती आहे?
पॅलेस्टिनींनी गाझात परत येऊ नये- ट्रम्प यांचे आव्हान-
डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या विधानात हेही स्पष्ट केले होते की, पॅलेस्टिनी गाझात परत येऊ इच्छितता कारण त्यांच्यांकडे दुसरा कोणता पर्याय नाही. परंतु पॅलेस्टिनींना दुसऱ्या ठिकाणी पुनर्वसन करावे आणि त्यांना शांततेत राहण्याची संधी द्यावी. त्यांनी असेही म्हटले की, अमेरिका गाझामधील नष्ट झालेल्या इमारतींचे पुनर्निर्माण करेल आणि तेथे आर्थिक विकास घडवून आणेल. त्यांच्या मते, यामुळे त्या भागातील लोकांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगार आणि घरे निर्माण होतील.
गाझा ताब्यात घेण्यामागची नेमकी रणनिती काय?
ट्रम्प यांना अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील संबंध आणखी मजबूत करायचे आहेत. गाझामध्ये अमेरिकन सैन्याची उपस्थिती राहिल्यास इराण आणि त्याच्या समर्थक शक्तींवर नियंत्रण ठेवण्यास मदत होऊ शकते. इस्त्रायलला राजनैतिक मान्यता मिळाल्यास अमेरिकेची भूमिका आणखी बळकट होईल हे यामागचे उद्दिष्ट आहे.
गाझामध्ये मोठे तेलसाठे नाहीत परंतु संपूर्ण मध्य पूर्व हा ऊर्जा संसाधनांचा प्रमुख केंद्र आहे. अमेरिकेला गाझावर नियंत्रण मिळाल्यास त्याचा फायदा अमेरिकेच्या व्यापार आणि राजकीय समीकरणांवर होऊ शकतो.
डोनाल्ड ट्रम्प यांना गाझाचा विकास करुन त्याला एक पर्यटन केंद्र बनवायचे आहे. त्यांना “मिडल ईस्टची रिवेरा” बनवायचे आहे. एकेकाळचे रिअल इस्टेट व्यावसायिक असलेल्या ट्रम्प यांची दृष्टी राजकीय पेक्षा आर्थिक फायद्यांवर केंद्रित आहे.
ट्रम्प यांना मिळणारे राजकीय आणि आर्थिक फायदे
डोनाल्ड ट्रम्प यांचे अमेरिकेतील प्रभावशाली यहूदी गटांशी घनिष्ट संबंध असून यामुळे त्यांना राजकीय पाठिंबा मिळतो. मध्य पूर्वेतील अस्थिरता रोखण्यासाठी गाझा ताब्यात घेणे अमेरिकेसाठी महत्त्वाचे ठरू शकते. भविष्यातील निवडणुकांसाठी ट्रम्प यांना राष्ट्रवादी आणि आक्रमक धोरणांचा आधार मिळू शकतो, यामुळे गाझाची भूमिका अधिक ठळक होते.
आंतरराष्ट्रीय आक्षेप आणि आव्हाने
मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्या समोर अनेक आंतरराष्ट्रीय आक्षेप आणि आव्हाने आहेत- सौदी अरेबिया, कतार संयुक्त अरब अमिरात आणि इतर अरब राष्ट्रांनी ट्रम्प यांच्या या प्रस्तावाचा तीव्र निषेध केला आहे. तसेच झेव्हा कन्व्हेन्शननुसार कोणत्याही देशाला एखाद्या प्रदेशावर बळजबरीने कब्जा करण्याची परवानगी नाही यामुळे देखील अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. याशिवाय पॅलेस्टिनी नागरिकांना गाझामधून बाहेर काढण्याच्या धोरणामुळे इस्रायल-विरोधी भावना अधिक तीव्र होऊ शकते.
ट्रम्प यांची इच्छा पूर्ण होऊ शकते का?
डोनाल्ड ट्रम्प यांच्या या योजनेच अमंलबजावणी करणे अत्यंत महागात पडणार आहे. संपूर्ण आंतरराष्ट्रीय समुदाय आणि संयुक्त राष्ट्रसंघ या विरोधात आहे. यामुळे अमेरिका आणि अरब देशांमधील संबंध बिघडण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या मते, डोनाल्ड ट्रम्प यांची ही इच्ढा केवळ राजकीय स्टंट असू शकतो मात्र, असे झाल्यास याचा परिणाम संपूर्ण जगावर होण्याची शक्यता आहे.