बशर अल-असद यांच्या पत्नीने मागितला घटस्फोट; रशियामध्ये नाखुश असल्याचा दावा
दमास्कस: सीरियात बंडखोर गटांच्या विद्रोहानंतर बशर अल-असद यांना त्यांच्या कुटूंबीयांसोबत देश सोडून पळून जावे लागले. त्यानंतर सीरियात सत्तापालट झाले आणि देशाची सत्ता HTS या विद्रोही गटाच्या हाती गेली. तर अल-असद ने रशियाची राजधानी मास्कोत त्यांच्या पत्नीसह आश्रय घेतला. दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. बशर असद यांच्या पत्नीने घटस्फोट मागितला असून त्या नाखुश असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
घटस्फोटासाठी रशियन न्यालयात अर्ज दाखल
सीरियाचे माजी अध्यक्ष बशर अल-असद यांच्या पत्नी असमा अल-असद यांनी रशियन न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. तुर्की आणि अरब माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, असमा मॉस्कोमध्ये राहून समाधानी नाहीत आणि ब्रिटनमध्ये जाण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. असमा यांनी रशियन न्यायालयाकडे घटस्फोट आणि मॉस्को सोडण्यासाठी परवानगी मागितली आहे. सध्या त्यांच्या या अर्जावर रशियन अधिकाऱ्यांकडून विचार सुरू आहे.
असमा अल-असद गंभीर आजारी
असमा यांच्याकडे सीरियन आणि ब्रिटिश नागरिकत्व आहे. असमा आणि बशर अल-असद यांची भेट लंडनमध्ये शिक्षण घेत असताना झाली होती आणि 2000 साली त्यांनी विवाह केला होता.एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, असमा यांना या वर्षी मे महिन्यात ल्यूकेमिया असल्याचे निदान झाले आहे. पाच वर्षांपूर्वीच त्या ब्रेस्ट कॅन्सरमधून बऱ्या झाल्या होत्या. काही माध्यमांनी असा दावा केला आहे की, रशियामध्ये असमा यांच्यावर कठोर निर्बंध लादण्यात आले आहेत. तसेच, त्यांना मॉस्को सोडण्यास किंवा राजकीय क्रियाकलापांमध्ये भाग घेण्यास मनाई करण्यात आली आहे.
संपत्ती जप्तीचा आरोप
मीडिया रिपोर्टनुसार, रशियाने असमा यांच्या संपत्तीवर ताबा मिळवला आहे. या संपत्तीत सोने, 2 अब्ज डॉलर आणि मॉस्कोतील अनेक अपार्टमेंटचा समावेश आहे. असमा यांचे भाऊ माहेर अल-असद यांना अद्याप रशियामध्ये शरणागती मिळालेली नाही. माहेर आणि त्यांच्या कुटुंबाला रशियामध्ये घरातच नजरकैदेत ठेवण्यात आल्याचे म्हटले जात आहे.
बशर अल-असद यांची सत्ता उलथवली
डिसेंबरच्या सुरुवातीला बशर अल-असद यांना हयात तहरीर अल-शाम (HTS) या गटाने सत्तेवरून हटवले. HTS हा गट अमेरिकेने दहशतवादी संघटना म्हणून घोषित केला आहे. अमेरिकन अधिकाऱ्यांनी HTS च्या प्रमुख अबू मोहम्मद अल-जुलानी यांच्यावर लावलेला $10 मिलियनचा इनाम काढून टाकण्याचे संकेत दिले आहेत.
असमा अल-असद यांचा घटस्फोटाचा अर्ज, रशियन निर्बंध आणि संपत्तीवरील जप्ती हे बशर अल-असद यांच्या राजकीय आणि वैयक्तिक आयुष्यातील मोठे वादळ असल्याचे दिसते. त्यांच्यावरील दबावामुळे सीरिया आणि रशियाच्या संबंधांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.