फोटो सौजन्य: सोशल मीडिया
मॉस्को: रशिया-युक्रेन युद्ध अधिकत चिघळत चालले आहे. हवाई हल्ल्यांची ही मालिका संपण्याचे कोणतेही चिन्ह दिसत नाही. दरम्यान रशियाच्या कझान शहरात निवासी इमारतींवर हल्ला करण्यात आला होता. हा हल्ला युक्रेनने केला असल्याचा रशियाचा आरोप आहे. यामुळे रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेनला “मोठी किंमत मोजावी लागेल” अशी धमकी दिली आहे. रशियाच्या मध्य भागातील कझान या शहरावर युक्रेनच्या ड्रोन हल्ला झाल्यानंतर पुतिन यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. कझान हे शहर युक्रेनच्या सीमेपासून सुमारे 1000 किलोमीटर (620 मैल) अंतरावर आहे.
युक्रेनला मोठी किंमत मोजावी लागेल
हा हल्ला रशियाच्या कझान शहरातील तीन उंच निवासी इमारतींवर करण्यात आला. इमारतीवर ड्रोन आदळले आणि मोठा स्फोट झाला. मात्र, या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाल्याचे माहिती मिळालेली नाही. पुतिन यांनी एका सरकारी बैठकीत युक्रेनला चेतावणी दिली की, “जो काही नुकसान करायचा प्रयत्न करतील, त्यांना याच्या तिप्पट पटीने अधिक नुकसान सहन करावे लागेल. युक्रेन आमच्या देशावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्याचा त्यांना पश्चात्ताप होईल.”
कझान हल्ला आणि युक्रेनची प्रतिक्रिया
मिळालेल्या माहितीनुसार,कझान येथे झालेल्या हल्ल्यावर अद्याप युक्रेनने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, रशियाने दावा केला आहे की, हे हल्ले युक्रेनने केले आहे. गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या युद्धामध्ये हवाई हल्ल्यांची ही मालिका सुरूच आहे.यापूर्वी पुतिन यांनी युक्रेनच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून कीव शहरावर हायपरसोनिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागण्याची धमकी दिली होती. तसेच, रशियन संरक्षण मंत्रालयाने युक्रेनच्या ऊर्जा सुविधांवर केलेल्या हल्ल्यांना पश्चिमी देशांमधून आलेल्या शस्त्रास्त्रांवर दिलेले उत्तर असल्याचे म्हटले आहे.
रशियाची युद्धभूमीतील कारवाई
या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर, रशियाने पूर्व युक्रेनमध्ये युद्धभूमीवर नवीन प्रगती केल्याचा दावा केला आहे. रशियन संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, त्यांनी खार्किव्ह प्रदेशातील लोजोवा गाव आणि क्रास्नोए (युक्रेनमध्ये सोन्त्सिवका) या गावांवर ताबा मिळवला आहे. ही गावे डोनेट्स्क प्रदेशासाठी महत्त्वाची मानली जात आहेत.रशियाने गेल्या काही महिन्यांत पूर्व युक्रेनमध्ये आपली हालचाल गतीने वाढवली आहे, कारण जानेवारीत अमेरिकेचे नव-निवडित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पदभार स्वीकारण्यापूर्वी शक्य तितका प्रदेश काबीज करण्याचा रशियाचा प्रयत्न आहे.
युक्रेनची स्थिती
रशियाच्या मते, 2024 मध्ये त्यांनी 190 हून अधिक युक्रेनियन बस्त्या जिंकल्या आहेत. युक्रेनच्या सैन्याला माणसांची व साधनसामुग्रीची कमतरता भासत असल्याने संघर्ष कठीण झाला आहे. रशिया-युक्रेन युद्ध आता आणखी तीव्र होत चालले आहे, आणि यामुळे जागतिक पातळीवरील तणाव वाढत आहे.